विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी नेत्यांची परिषद

मुंबई: हैदराबाद गॅझेटनुसार नोंदी आढलेल्या मराठा समजाला कुणबी आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारकडून काढण्यात आलेल्या शासन निर्णयाला ओबीसी नेत्यांकडून विरोध करण्यात आला आहे. सरकारने या शासन निर्णयातील पात्र हा शब्द वगळल्याने मराठा समाजाला इतर मागासवर्गातील (ओबीसी) आरक्षण सरसकट मिळण्याची शक्यता आहे. हे अन्यायकारक असून याविरोधात न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई येत्या काळात लढली जाईल, अशी भूमिका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केली.

ओबीसी संघटनांची परिषद विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली आज यशवंतराव चव्हाण केंद्र येथे पार पडली. या बैठकीत न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलने अशा दोन स्तरांवर लढा देणार असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या ओबीसींना एकत्र केले जाणार आहे. सुरुवातीला विभागीय स्तरावरील नेत्यांकडे याची जबाबदारी सोपविण्यात आली असून सरकारच्या शासन निर्णयाविरोधात तालुक्या तालुक्यात आंदोलने केली जातील, असे ते म्हणाले.

आमचा कुणबी समाजाला असलेल्या ओबीसी आरक्षणाला विराेध नाही. त्याचप्रमाणे ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत अशा आरक्षणालाही विरोध नाही. मात्र सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यास त्यामुळे ओबीसींच्या हक्कावर गदा येणार आहे. याविरोधात आम्ही न्यायाालयात याचिका दाखल करणार आहोत, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

हाके, भुजबळ, शेंडगे यांचेही तेच मत

या परिषदेला मंत्री छगन भुजबळ, लक्ष्मण हाके, प्रकाश शेंडगे हे ओबीसी नेते का उपस्थित राहिले नाहीत, असा प्रश्न करण्यात आला असता या परिषदेला ते उपस्थित नसले तरी त्यांचेही तेच मत आहे. छगन भुजबळ स्वत: यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. त्यामुळे आपला लढा एकच असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. ओबीसी समाजासाठी आंदोलन करीत असताना आपल्या पक्षाची पादत्रारे बाहेर काढून यावे. समजासाठी लढणाऱ्या प्रत्येकाला हे आपले आवाहन असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. या बैठकीला आगरी समाजाचे राजाराम पाटील, धनगर समाजाचे जयसिंगराव शेंडगे, माळी महासंघाचे शंकरराव लिंगे, बारा बलुतेदार संघटनेचे दत्ता चेचर, ओबीसी समाजाचे सुशीला मोराडे आदी उपस्थित होते.

मूळ प्रश्नांवरून लक्ष हटविण्यासाठी दोन समाजात भांडण

राज्यातील महायुती सरकार हे राज्यातील प्रश्नावरून लक्ष हटविण्यासाठी दोन समाजात भांडण लावत आहे. राज्यात शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर आहे. राज्याची आर्थिक स्थितीही बिकट आहे. शेतकरी, कंत्राटदार आत्महत्या करीत आहेत. या प्रश्नांवरून लक्ष हटविण्यासाठीच सरकार मराठा विरुद्ध ओबीसी असे भांडण लावत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला