मुंबई : लठ्ठपणा कमी करण्यासाठी देण्यात येणारे सेमाग्लुटाईड हे औषध २०२६ मध्ये पेटंटमुक्त झाल्यास त्याचे जेनेरिक औषध बाजारात उपलब्ध होईल. त्यामुळे नागरिकांना लठ्ठपणावरील औषध स्वस्तात उपलब्ध होईल. लठ्ठपणाचा सामना करणाऱ्या देशातील सुमारे १८ कोटींहून अधिक नागरिकांना याचा फायदा होईल.

इंटरनॅशनल मेटाबॉलिक फिजिशियन असोसिएशनचे (इम्पा) दुसरे राष्ट्रीय अधिवेशन नुकतेच मुंबईत पार पडले. मधुमेह आणि लठ्ठपण या दुहेरी आव्हानाला तोंड देण्यासाठी परस्पर संवाद आणि एकात्मिक उपाययोजनांची गरज असल्याचे मत देशातील तज्ज्ञ मंडळींनी या अधिवेशनात व्यक्त केले. लठ्ठपणावर उपलब्ध असलेल्या औषधांपैकी महत्त्वाचे सेमाग्लुटाईड २०२६ मध्ये पेंटटमुक्त होण्याची शक्यता आहे. हे औषध पेंटटमुक्त झाल्यास त्याचे जेनेरिक औषध बाजारात येण्याचा मार्ग मोकळा होईल. यामुळे देशामध्ये लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करीत असलेल्या रुग्णांना दर्जेदार उपचार उपलब्ध होतील. मात्र मागणी वाढते, तेव्हा गैरप्रकारालाही चालना मिळते, त्यामुळे सतर्कता आवश्यक आहे, असे ‘इम्पा’चे सरचिटणीस डॉ. केतन पखाले यांनी सांगितले.

पुढील वर्षामध्ये सेमाग्लुटाईड पेटंटमुक्त झाल्यास त्याचे जेनेरिक स्वरूपही बाजारात येऊन लठ्ठपणाशी झुंजणाऱ्या १८ कोटींहून अधिक नागरिकांना याचा लाभ होण्याची शक्यता आहे. मेटाबॉलिक विकारांवरील लढ्यात हा एक निर्णायक क्षण ठरू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

भारतामध्ये मधुमेहाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मधुमेह हा भारतातील सर्वात मोठा आजार समजला जातो. मधुमेहासाठी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणारे एम्पाग्लिफ्लोजिन हे औषध पेटंटमुक्त झाल्याने अनेक भारतीय औषध निर्मात्यांनी या औषधाचे जेनेरिक स्वरुप बाजारात आणले आहे. या जेनेरिक स्वरुपाची किंमत मूळ किमतीच्या ९० टक्के इतक्या कमी आहे. यामुळे देशातील ११ कोटींहून अधिक मधुमेह झालेल्या रुग्णांना परवडणाऱ्या दरात औषधे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे ‘इम्पा’चे अध्यक्ष डॉ. नितीन पाटणकर यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जेनेरिक एम्पाग्लिफ्लोजिन केवळ मधुमेहासाठीच नव्हे तर हृदयासंदर्भातील आजारांकरीताही वापरण्यात येत असल्याने रुग्णांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. यामुळे रुग्णांचा आर्थिक भार कमी होईल आणि उपचारांशी सातत्य ठेवणे सुलभ होईल, असेही डॉ. पाटणकर यांनी सांगितले. मधुमेह आणि लठ्ठपणा यांसारख्या वाढत्या आजारांचा सामना करऱ्यांसाठी संशोधन, सहकार्य आणि धोरणात्मक कृतीद्वारे दर्जेदार आणि परवडणारे उपचार उपलब्ध करण्यासाठी ‘इम्पा’ कार्यरत असल्याचे डॉ. पाटणकर यांनी सांगितले.