मुंबई : पूर्व द्रुतगती मार्गावर शुक्रवारी पहाटे टँकरमधून मोठ्या प्रमाणात ऑइलची गळती झाली. पूर्व द्रुतगती महामार्गावर सांडलेल्या ऑइलमुळे अनेक वाहनांचे अपघात झाले. सुदैवाने या अपघातांमध्ये कोणीही जखमी झाले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच उपाययोजना केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

ठाण्याहून शुक्रवारी पहाटे एक टँकर मोठ्या प्रमाणात ऑइल घेऊन मुंबईच्या दिशेने जात होता. हा टँकर विक्रोळी परिसरात येताच अचानक त्यातून मोठ्या प्रमाणात ऑइलची गळती सुरू झाली. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर ऑइल पसरले. अनेक वाहने ऑइलवरून घसल्याने अपघात झाले. वाहतूक पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले.

अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्त्यावर सांडलेल्या ऑईलवर तत्काळ माती टाकल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. रस्त्याच्या मधोमध ऑइल सांडल्याने पूर्व द्रुतगती मार्गावर सकाळी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. अखेर वाहतूक पोलिसांनी एका मार्गिकेवरून वाहतूक सुरू केल्यानंतर सकाळी ९ च्या सुमारास वाहतूक कोंडी काहीशी कमी झाली.