मुंबईच्या रस्त्यांवर १६ वर्षे चाललेल्या रिक्षा आणि २० वर्षे वयोमान संपलेल्या टॅक्सी भंगारात काढून रस्त्यांवरून बाजूला कराव्यात, असे नियम असतानाही हजारो जुन्या रिक्षा-टॅक्सी रस्त्यांवर धावत आहेत. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या शिफारशीनुसार अशा रिक्षा-टॅक्सी नेस्तनाबूत करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जेसीबीचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. बोरिवली प्रादेशिक परिवहन कार्यालयात ही प्रक्रिया गुरुवारपासून सुरू झाली आणि पहिल्याच दिवशी १४ रिक्षा पूर्णपणे तोडल्या गेल्या. मुंबईच्या रस्त्यांवर वयोमर्यादा उलटलेल्या हजारो रिक्षा धावत असल्याचा आरोप रिक्षा संघटनाच करत असल्याने या कारवाईला अधिक धार मिळणार आहे.
आयुर्मान उलटलेल्या रिक्षा आणि टॅक्सी रस्त्यांवर उतरवण्याऐवजी भंगारात काढल्या जाव्यात, असे आदेश परिवहन विभागाने दिले आहेत. या गाडय़ा प्रादेशिक परिवहन कार्यालयात जमा होऊन तीन भागांत तोडून भंगारातही काढल्या जातात. मात्र अनेकदा भंगारात गेलेल्या गाडय़ा दुरुस्त करून त्याच क्रमांकाने मुंबईच्या इतर भागांत चालवल्या जात असल्याचे उघडकीस आले आहे. अशा भंगारातील हजारो गाडय़ा कुर्ला-वांद्रे यांसह विविध भागांत चालवल्या जात असल्याचा आरोप अनेक रिक्षा संघटनांनी वारंवार केला आहे. तसेच या बेकायदेशीर रिक्षांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाई करावी, अशी मागणीही या रिक्षा संघटनांनी केली आहे.या भंगारातल्या रिक्षा पुन्हा रस्त्यांवर येऊच नयेत, यासाठी त्या नेस्तनाबूत करण्याची सूचना राज्य परिवहन प्राधिकरणाने परिवहन विभागाला दिली आहे. या सूचनेनुसार बोरिवलीच्या प्रादेशिक परिवहन केंद्रात गुरुवारपासून अशा रिक्षा जेसीबीच्या साहाय्याने मोडून काढण्याची कारवाई सुरू झाली आहे. या कारवाईत पहिल्याच दिवशी १४ रिक्षा भंगारात निघाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 12th Jul 2015 रोजी प्रकाशित
वयोमान संपलेल्या १४ रिक्षांचा ‘चुराडा’
मुंबईच्या रस्त्यांवर १६ वर्षे चाललेल्या रिक्षा आणि २० वर्षे वयोमान संपलेल्या टॅक्सी भंगारात काढून रस्त्यांवरून बाजूला कराव्यात, असे नियम असतानाही हजारो जुन्या रिक्षा-टॅक्सी रस्त्यांवर धावत आहेत.
First published on: 12-07-2015 at 05:22 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Old rickshaw trash by rto