एकतर्फी प्रेमातून तरुणीवर ब्लेडने हल्ला करणाची घटना बोरिवली येथे उघडकीस आली आहे. पोलिसांनी या तरुणास अटक केली आहे. अवघ्या एका महिन्यापूर्वी या दोघांची फेसबुकवर ओळख झाली होती.
बोरिवलीच्या कुलुपवाडी येथे राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीची महिन्याभरापूर्वी फेसबुकवर मयूर बटावले (२५) याच्याशी ओळख झाली होती. मयूरने तिचा पत्ता आणि फोन नंबर मिळवून तिला भेटायला बोलावले. १५ दिवसांपूर्वी ते एकमेकांना भेटलेही होते. या भेटीनंतर मयूरने लगेच या तरुणीला थेट लग्नाची मागणी घातली होती. या मागणीला तिने सपशेल नकार दिला. त्यामुळे मयूर संतप्त झाला होता. बुधवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ही तरुणी आपल्या  ब्युटी पार्लरवरून घरी परतत असताना रस्त्यात दबा धरून बसलेल्या मयूरने ब्लेडने तिच्यावर वार केला. त्यात तिच्या हनुवटीपासून कानापर्यंत गंभीर इजा झाली. तिला तात्काळ भगवती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिला एकूण २२ टाके घालण्यात आले. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना मयूर तिला फोन करत होता. पोलिसांनी मग सापळा लावून नेहाच्या माध्यामातून मयूरला रुग्णालयात बोलावून घेतले व त्याला अटक केली.