मुंबई: राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘नाफेड’च्या माध्यमातून तीन कंपन्यांमार्फत कांदा खरेदी सुरु करण्यात आला असून आतापर्यंत १८ हजार क्विंटल कांदा खरेदी करण्यात आला आहे. आता बाजार समितीमध्ये खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील आणि खरेदी केंद्र्ही वाढविली जातील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी विधानसभेत दिली.
राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून त्यांना सरकारने तातडीने अनुदान द्यावे अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी केला जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असले तरी वस्तुस्थिती वेगळी आहे. नाफेड केवळ व्यापाऱ्यांकडून कांदा खरेदी करीत आहे. तर व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी दरात कांदा खरेदी करून तो वाढीव किंमतीमध्ये नाफेडला विकत असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला.
नाफेडच्या खेरदीनंतरही कांद्याच्या भावात कुठलीही वाढ झालेली नसून शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे नाफेडच्या माध्यमातून प्रत्यक्ष बाजार समितीत लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊन कांदा खरेदी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. त्यावर कांदा खरेदीसाठी नाफेड मार्फत राज्यात एकूण दहा केंद्र सुरु करण्यात आली असून नाफेडने नेमलेल्या कंपन्यांच्या माध्यमातून कांदा खरेदी करीत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
अनुदान विचाराधीन
आतापर्यंत १८ हजार ७४३ क्विंटल कांदा खरेदी केला आहे. नाफेडला आता बाजार समित्यांमध्ये प्रत्यक्ष कांदा खरेदी करण्यात सांगण्यात येईल. शेतकऱ्यांना अनुदान देणे विचाराधीन आहे. समितीच्या अहवालानंतर अनुदान घोषित करण्यात येईल असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.