ओल्या कांद्याची आवक गेल्या काही दिवसांपासून मोठय़ा प्रमाणावर वाढल्याने मुंबईच्या बाजारात सुक्या आणि तुलनेने जुन्या कांद्याचे दर पुन्हा एकदा वाढू लागले असून वाशीतील घाऊक बाजारात उत्तम प्रतीचा कांदा ६२ रुपयांनी विकला गेला तर किरकोळ बाजारात याच कांद्याने प्रथमच सत्तरी ओलांडल्याचे चित्र दिसू लागले आहे.
मुंबई कृषी ऊत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या वाशी घाऊक बाजारात गेल्या काही दिवसांपासून नव्या कांद्याची आवक वाढली असली तरी त्यापैकी अध्र्याहून अधिक कांदा फेकून द्यावा लागत असल्याने जुन्या आणि सुक्या असलेल्या कांद्याचे दर वाढू लागले आहेत, असे कांदा, बटाटा आडत व्यापारी संघाचे पदाधिकारी चंद्रकांत रामाणे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
वाशी बाजारात मंगळवारी दिवसभर तब्बल ८० गाडी कांद्याची आवक झाली. त्यापैकी ४८ गाडय़ांमध्ये नवा कांदा होता. काहीसा ओला असलेला हा कांदा घाऊक बाजारात ४९ रुपये किलो या दराने विकला जात असला तरी किरकोळ बाजारात त्याने साठी ओलांडली आहे.
नवरात्रोत्सवातील अतिवृष्टीमुळे नवीन लाल कांद्याची आवक घटली असताना दुसरीकडे उन्हाळ कांद्याची पुरेशी उपलब्धता नसल्याने नाशिक जिल्ह्यात कांद्याचा प्रति क्विंटलचा सरासरी भाव ५३५१ रुपयांपर्यंत गेला आहे.

निर्यातबंदी शक्य
पाच राज्यांच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर कांद्याची दरवाढ रोखण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे.