दहावी, बारावीच्या परीक्षा तोंडावर आलेल्या असतानाही अद्याप शाळा सुरू न झाल्यामुळे आता विद्यार्थ्यांना परीक्षाचिंतेने ग्रासले आहे. दरवर्षीप्रमाणे परीक्षा न होता यंदा ऑनलाइन परीक्षा व्हावी आणि पन्नास टक्के गुण हे अंतर्गत मूल्यमापनासाठी असावेत असे मत मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील विद्यार्थ्यांनी एका सर्वेक्षणात व्यक्त केले आहे. शाळा, महाविद्यालये सुरू झाली नाहीत, तर मंडळाच्या परीक्षा चांगल्या रितीने देता येणार नाहीत असेही जवळपास ५० टक्के विद्यार्थ्यांना वाटत आहे.

राज्यातील सर्व भागांतील शाळा सुरू झाल्या तरीही अद्याप मुंबईतील शाळा सुरू झालेल्या नाहीत. राज्य मंडळाने मात्र दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिक्षक जयवंत कुलकर्णी यांनी दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत विद्यार्थ्यांच्या मतांचे ऑनलाइन सर्वेक्षण केले. एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी या सर्वेक्षणात आपली मते नोंदवली.

शाळा सुरू करा..

आतापर्यंत ऑनलाइन वर्गाच्या माध्यमातून ८० टक्क्य़ांपेक्षा अधिक अभ्यासक्रम पूर्ण झाला असल्याचे ३१ टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. मात्र, येत्या काही दिवसांत शाळा, महाविद्यालये सुरू झाली नाहीत, तर चांगल्या रितीने परीक्षा देता येणार नाही असे विद्यार्थ्यांना वाटत असून ५०.२ टक्के विद्यार्थ्यांनी असे मत नोंदवले आहे. २०.२ टक्के विद्यार्थ्यांनाच शाळा सुरू झाल्या नाहीत तरी परीक्षा देण्याबाबत विश्वास वाटत आहे. तर २९.६ टक्के विद्यार्थ्यांनी याबाबत निश्चित मत नोंदवलेले नाही. शाळा, महाविद्यालये सुरू झाल्यावर मात्र फक्त परीक्षेत गुण मिळवण्यापुरतेच शिक्षकांनी शिकवावे असे सर्वाधिक म्हणजे २५ टक्के विद्यार्थ्यांना वाटत आहे, तर फक्त गणित, विज्ञान आणि इंग्रजीच्या नियमित तासिका घ्याव्यात असे २० टक्के विद्यार्थ्यांना वाटते. १८ टक्के विद्यार्थ्यांना मात्र अतिरिक्त तासिका घेऊन सर्व अभ्यासक्रम पुन्हा शिकवण्यात यावा असे वाटत आहे.

शासकीय उपक्रमांबद्दल अनभिज्ञ

दहावीनंतर विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक मार्ग निवडण्यास मदत व्हावी म्हणून शिक्षण विभागाकडून दरवर्षी ‘कलचाचणी’ घेण्यात येते. कलचाचणीबद्दल काहीच माहीत नसल्याचे मत ३७.३ टक्के विद्यार्थ्यांनी नोंदवले आहे, तर १७.४ टक्के विद्यार्थ्यांना परीक्षेनंतर कलचाचणी व्हावी असे वाटते आहे. यंदा कलचाचणी घेऊच नये असे मत १५.९ टक्के विद्यार्थ्यांनी नोंदवले आहे तर २९.४ टक्के विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणेच कलचाचणी व्हावी असे वाटते आहे. शिक्षण विभागाने राज्यात ४२८ समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. मात्र, या उपक्रमाबाबत ८० टक्के विद्यार्थ्यांना माहितीच नसल्याचे या सर्वेक्षणातून दिसत आहे. त्याचवेळी समुपदेशन आवश्यक असल्याचे मत ७२ टक्के विद्यार्थ्यांनी नोंदवले आहे.

विद्यार्थ्यांना काय वाटते?

८२.८ टक्के विद्यार्थ्यांनी पन्नास टक्के अंतर्गत मूल्यांकन व्हावे असे मत नोंदवले आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील ६८.३ टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षांच्या बाजूने कौल दिला आहे. लिखाणाचा सराव न झाल्यामुळे वेळेत उत्तरपत्रिका लिहून होणार का अशी शंका वाटत असल्याचे ६५.१ टक्के विद्यार्थ्यांनी नोंदवले आहे. लेखन सरावाअभावी शुद्धलेखनाच्या चुका होण्याची भीती १२.१ टक्के तर वाईट हस्ताक्षराची भीती १० टक्के विद्यार्थ्यांना वाटत आहे. परीक्षा देण्याच्यादृष्टीने ४० ते ५० टक्केच अभ्यास झाला असल्याचे सर्वाधिक म्हणजे २१ टक्के विद्यार्थ्यांचे मत आहे.