मुंबई : ऑनलाईन फसवणूक प्रकरणात अटक झालेल्या ५६ वर्षांच्या व्यक्तीला सत्र न्यायालयाने जामीन नुकताच मंजूर केला. तथापि, प्रकरणातील फरारी आरोपीने फसवणूक केलेली रक्कम जमा करण्यासाठी या व्यक्तीला बँक खाते उघडण्यास सांगून ते बेकायदेशीररीत्या वापरले. त्यामुळे, न्यायालयाने या व्यक्तीला जामीन मंजूर करताना तो मूर्ख असल्याची टिप्पणी करून त्याची कानउघाडणी केली.

ऑनलाईन फसवणूक करून तक्रारदाराच्या खात्यातून फरारी आरोपीने आठ लाख रुपये काढले. ऑनलाईन शेअर खरेदी-विक्रीमध्ये नफा मिळवून देण्याचे आश्वासन देऊन फरारी आरोपीने तक्रारदाराची फसवणूक केली होती. त्याने तक्रारदाराच्या खात्यातून काढलेल्या आठ लाख रूपयांपैकी तीन लाख रुपये जुनैद शेख याच्या बँक खात्यात वळवले होते. फरारी आरोपीने शेख याच्या बँक खात्याचा फसवणुकीसाठी बेकायदेशीर वापर केला होता. तथापि, या प्रकरणी पोलिसांनी शेख याला भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती.

आपण निर्दोष असून फरारी आरोपीने आपल्याला छोट्या रकमेसाठी बँक खाते उघडण्यासाठी उद्युक्त केले. मात्र, फरारी आरोपीने आपण उघडलेले बँक खाते ऑनलाईन फसवणुकीची रक्कम वळवण्यासाठी वापरले, असा दावा शेख याने जामिनाची मागणी करताना केला होता. त्याचा दावा मान्य करून अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी त्याला नुकताच जामीन मंजूर केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यायालयाने काय म्हटले ?

या प्रकरणी दाखल प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) नीट वाचल्यानंतर फरारी आरोपीने काही बँक खाती खरेदी केली होती आणि तक्रारदाराचे पैसे त्या खात्यांमध्ये जमा केले होते. नंतर, फरारी आरोपीने ते पैसे त्याच्या वैयक्तिक वापरासाठी वळवले, असे न्यायालयाने शेख याला जामीन मंजूर करताना नमूद केले. त्याचवेळी, शेख याचा तक्रारदार किंवा अन्य कोणालाही फसवण्याचा हेतू नव्हता. तथापि, फरारी आरोपीने शेख याला बँक खाते उघडण्यस सांगून त्याचा बेकायदेशीररीत्या वापर केला. यावरून शेख याचा मूर्खपणा स्पष्ट होतो, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली. तसेच, शेख याला कारागृहात ठेवणे आवश्यक नाही. त्याला कारागृहात ठेवल्याने काही साध्यही होणार नाही, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले.