दुर्मीळ जीवांच्या अवशेषांचे ‘ऑनलाइन’ दर्शन

टॅक्सीडर्मी पद्धतीचा अवलंब केला जातो. सध्या या ठिकाणी एक हजारहून अधिक जीवांचे टॅक्सीडर्मी प्रदर्शित होत आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

अक्षय मांडवकर

एक हजारहून अधिक ‘टॅक्सीडर्मी’चे डिजिटलायझेशन; छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या अ‍ॅपसाठी संकलन

शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयमधील ८० वर्षे जुना ‘प्राकृतिक इतिहास विभाग’ कात टाकत आहे. या विभागात सुमारे शतकाहून अधिक काळ जतन केलेले एक हजारहून अधिक पशू,पक्षी आणि सागरी जीवांच्या अवशेषांच्या (टॅक्सीडर्मी) डिजिटल संकलनाचे काम सुरू आहे. वस्तुसंग्रहालय प्रशासनतर्फे येत्या काळात निर्माण करण्यात येणाऱ्या अ‍ॅपकरिता संकलन करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात पर्यटकांना हा दुर्मीळ ठेवा ऑनलाइन पाहता येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या प्राकृतिक इतिहास विभागातील कर्मचारी मृत पशू, पक्षी आणि सागरी जीवांच्या शरीराचे जतन करण्याचे काम करतात. यासाठी टॅक्सीडर्मी पद्धतीचा अवलंब केला जातो. सध्या या ठिकाणी एक हजारहून अधिक जीवांचे टॅक्सीडर्मी प्रदर्शित होत आहेत. वस्तुसंग्रहालयाच्या लोकार्पणानंतर ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ (बीएनएचएस) या संस्थेने आपल्याकडील टॅक्सीडर्मीचा अमूल्य ठेवा वस्तुसंग्रहालयाला दिला. १९२३ साली प्रथम विविध पशू-पक्षी यांचे टॅक्सीडर्मी प्रदर्शित करण्यात आले. त्यानंतर आलेल्या ब्रिटिश अभिरक्षकांनी त्यामध्ये भर घातली. १९३८ च्या सुमारास स्वतंत्र कक्ष उभारून यांचे प्रदर्शन मांडण्यात आले. हे प्रदर्शन आजतागायत सुरू आहे.

सध्या या विभागात पक्ष्यांच्या ३४९ प्रजाती, प्राण्यांच्या ७७ प्रजाती, समुद्री जीवांच्या १७७ प्रजाती आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या सुमारे ८० प्रजातींचे जतन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने संकटग्रस्त प्रजातींच्या यादीतील गिधाड, माळढोक, लाल पांडा, शेकरू, हंगुल, खवले मांजर या जीवांच्या टॅक्सीडर्मीचा समावेश आहे. येत्या काळात प्रशासनाकडून निर्माण केल्या जाणाऱ्या अ‍ॅपकरिता अवशेषांचे छायाचित्रण करून त्यांची सखोल माहिती संकलित करण्याचे काम सुरू असल्याची माहिती विभागाचे साहाय्यक अभिरक्षक मनोज चौधरी यांनी दिली. यासाठी बहुतांश अवेशष ‘बीएनएचएस’ या संस्थेचे असल्याने प्रत्येक जीवाच्या अवशेषाचा इतिहास जाणून घेण्यासाठी त्यांच्यासोबत पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जतन प्रक्रिया

विभागातील कर्मचारी निरनिराळ्या पद्धतींचा अवलंब करून या अवशेषांचे जतन करीत आहेत. यामध्ये मॉल्टिंग कास्टिंग, मेण, पीओपी, लाकडी भुसा, फोम, द्रव्य फोम यांसारख्या पद्धतींचा समावेश आहे.

यामध्ये सर्वप्रथम जीवाच्या मृत्यूनंतर कोणत्या शारीरिक अवस्थेत त्याचे प्रदर्शन करावयाचे आहे, याचा निर्णय घेतला जातो. त्या पद्धतीने त्याची कातडी काढली जाते. त्यानंतर कातडीमध्ये वरील पद्धतीच्या आधारे प्रक्रिया करून त्याचे जतन केले जाते. वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षण लाभलेल्या प्रजातींचे जतन वन विभागाच्या परवानगीने केले जाते.

विभागातील वैशिष्टय़पूर्ण जीव

* राणीबागेतील लक्ष्मीनामक पांढरी वाघीण, दोन गेंडे, नीलगाय, ऑस्ट्रेलियन स्वॉन यांचे अवशेष

* १९३० च्या सुमारास मुंबईच्या बंदरावर वाहून आलेला व्हेल शार्क आणि शॉफिश यांचे २१ फुटांचे अवशेष

* मेळघाटातील दोन पट्टेरी वाघ आणि दक्षिण भारतातून आणलेल्या गव्याचे सत्तर वर्षांपूर्वीचे अवशेष

* १८५० च्या सुमारास ओव्हल मैदानावरील सर्कसमध्ये मृत्यू झालेल्या हत्तीच्या पिल्लाचे जतन

* पाच वर्षांपूर्वी एका उद्योगपतीने दिलेल्या बिबटय़ाचे जतन

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Online visions of the rare living beings

ताज्या बातम्या