डेंग्यूमुळे मुंबईकरांची झोप उडाली असतानाच या आजाराने आतापर्यंत केवळ सात मृत्यू झाल्याचे महापालिकेने बुधवारी जाहीर केले. ऑक्टोबर महिन्यातील डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या तीन हजारांवर पोहोचली असून डेंग्यूचे निदान झालेल्या रुग्णांची संख्या ६५९ वर गेली आहे. डेंग्यू पसरवणाऱ्या डासांच्या अळ्या सापडण्याचे प्रमाण उच्चभ्रू वस्तींमध्ये अधिक असून डेंग्यूच्या ८५ टक्के रुग्णांच्या घरात व शेजारी एडीस इजिप्ती डासांच्या अळ्या सापडल्या आहेत.
एकीकडे साध्या तापातही डेंग्यूच्या भीतीने तपासण्या व रुग्णालयाचा खर्च करण्यासाठी नागरिक पुढेमागे पाहत नसताना पालिका मात्र डेंग्यू नियंत्रणात असल्याचे चित्र रंगवत आहे. जानेवारी ते आतापर्यंत संपूर्ण मुंबईत डेंग्यूचे केवळ सात मृत्यू झाल्याचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी सांगितले. पालिकेने सुरू केलेल्या धूम्रफवारणीमुळे मलेरिया पसरवणारे डास नियंत्रणात आले असले तरी डास घरातील स्वच्छ पाण्यात अंडी घालत असल्याने पालिका कर्मचाऱ्यांना तिथपर्यंत पोहोचणे अवघड झाले आहे. जुहू परिसरातील अनेक इमारती तसेच बंगल्यांमध्ये पालिका कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जात नाही. दोन ते तीन तास थांबवून ठेवले जाते, अशी माहिती देशमुख यांनी दिली.
महापालिकेची कारवाई
डेंग्यू पसरवणाऱ्या डासांच्या अळ्या सापडल्याप्रकरणी पालिकेने १३,२४७ जणांना नोटीस देण्यात आली आहे. ८६४ जणांवर दंडाधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे, तर ३४४ जणांवर सुनावणी सुरू आहे. डासांच्या अळ्या सापडल्याप्रकरणी पालिकेने आतापर्यंत २३ लाख २२ हजार ४०० रुपये दंड गोळा केला आहे.
केईएममध्ये तीन डॉक्टरांना डेंग्यू
केईएममधील निवासी डॉक्टर श्रुती खोब्रागडे हिचा डेंग्यूने मृत्यू झाला असताना केईएमच्याच आणखी तीन डॉक्टरांनाही डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मेडिसीन विभागात काम करणाऱ्या डॉ. रुज दुर्गे यांना डेंग्यूमुळे रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. बालरुग्ण विभागातील डॉ. शशी यादव आणि हृदयविकार विभागातील डॉ. अरविंद सिंग यांनाही डेंग्यू झाला आहे. डेंग्यूच्या डासांची वाढ अजूनही रुग्णालय परिसरात होत असल्याचाच हा पुरावा आहे. मात्र रुग्णालय व्यवस्थापनाकडून याबाबत प्रभावी पावले उचलली जात नाहीत. निवासी डॉक्टरांसाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्यासंदर्भात अधिष्ठाता डॉ. शुभांगी पारकर यांच्यासोबत गुरुवारी पुन्हा बैठक होणार आहे, अशी माहिती मार्डचे पदाधिकारी डॉ. अनुराध धोंडियाल यांनी दिली.
केईएमवर कारवाई होणार!
मुंबईत डेंग्युने थैमान घातले असताना डेंग्युच्या अळ्या आढळणाऱ्या सोसायटय़ांवर कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मात्र या निर्णयानुसार आता मुंबई महापालिकेच्या अखत्यारितील केईएम रुग्णालयावरच हा कारवाईचा बडगा उचलण्याची वेळ पालिकेवर आली आहे. केईएम रुग्णालयात डेंग्युच्या डासांच्या अळ्या मोठय़ा प्रमाणावर आढळत असून तेथील निवासी डॉक्टरांनाही डेंग्युची लागण झाली आहे. त्या पाश्र्वभूमीवर महापौर स्नेहल आंबेकर यांनी केईएम रुग्णालयावर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
आठवडय़ात चार मृत्यू
गेल्या आठवडय़ाभरात डेंग्यूमुळे चार मृत्यू झाल्याने पालिका अधिकारीही हादरले आहेत. शनिवारी नायर रुग्णालयात संदीप गायकवाड यांचा मृत्यू झाला. त्यापूर्वी २७ ऑक्टोबर रोजी केईएमच्या निवासी डॉक्टर श्रुती खोब्रागडे यांचा हिंदुजामध्ये, २ नोव्हेंबर रोजी शुभम तिवारी या २० वर्षीय तरुणाचा केईएममध्ये, तर ३ नोव्हेंबर रोजी दळवी रुग्णालयात निशा चव्हाण यांचा डेंग्यूने मृत्यू झाला.