मुंबई : पूर्व उपनगरील मानखुर्द परिसरातील मुंबई महानगरपालिकेच्या ‘मुंबई पब्लिक स्कूल’मध्ये ५५० विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी केवळ दोनच शिक्षक उपलब्ध आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असून यामुळे पुन्हा एकदा पालकांनी महानगरपालिकेच्या शाळेकडे पाठ फिरवून आपल्या पाल्यासाठी खासगी शाळांची वाट धरली आहे.

महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी काही वर्षांपासून मुंबई शहरात अनेक ठिकाणी ‘मुंबई पब्लिक स्कूल’ सुरू करण्यात आले. तीन वर्षांपूर्वी पूर्व उपनगरातील मानखुर्द परिसरातील महाराष्ट्र नगर येथे ही शाळा सुरू करण्यात आली. पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण या शाळेत घेता येते. या शाळेत सध्या ५६० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तीन वर्षांपूर्वी शाळा सुरू झाल्यानंतर आपल्या पाल्याला या शाळेत प्रवेश घेण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी झुंबड उडाली होती. मुलांना इंग्रजी माध्यमातून उत्तम दर्जाचे शिक्षण मिळणार, शिवाय हे शिक्षण पूर्णपणे मोफत असल्याने अनेक पालकांनी खासगी शाळेमधून मुलांना काढले आणि या शाळेत प्रवेश घेतला होता.

आणखी वाचा-वीज खरेदीचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात; परवानगीनंतरच प्रक्रिया राबविण्याचे आदेश

मात्र गेल्या दोन वर्षांपासून या शाळेत शिक्षकांची संख्या अपुरी असून याचा परिणाम शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. सध्या या शाळेत इयत्ता पहिली ते सातवी असे १४ वर्ग सुरू आहेत. मात्र १४ वर्गांसाठी केवळ दोनच शिक्षक उपलब्ध असल्याने मुलांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. अनेकदा कंत्राटी पद्धतीने काही दिवसांसाठी शिक्षक बोलवण्यात येतात. मात्र कधी-कधी ते देखील उपलब्ध होत नसल्याने दिवसभर विद्यार्थ्यांना शिक्षकांविनाच शाळेत बसून राहावे लागत आहे. अनेक वेळा शाळेतील मुख्यध्यापकाना कार्यालयीन कामकाज सोडून मुलांना शिकवण्यासाठी जावे लागत आहे.

गेल्या दोन वर्षांपासून या शाळेत अशी परिस्थिती आहे. सध्या काही पालकांनी या शाळेकडे पाठ फिरविली आहे. परिणामी, गेल्या दोन वर्षांत या शाळेतील सुमारे ४० ते ५० विद्यार्थ्यांनी परिसरातील खासगी शाळेत प्रवेश घेतला आहे. याबाबत येथील मनसेचे विभागप्रमुख रवींद्र गवस यांनी महापालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून शाळेत तत्काळ शिक्षकांची भर्ती करण्याची मागणी केली आहे. याबाबत पूर्व उपनगराचे पालिका उपशिक्षण अधिकारी किर्तीवर्धन किरतकुडवे यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

आणखी वाचा-क्रिकेट संघाच्या मिरवणुकीसाठी गुजरातची बस, विरोधकांची सरकारवर टीका; म्हणाले, “आमची BEST…”

आम्हाला शिक्षण घेता आले नाही. मात्र आमच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी आम्ही त्यांना या शाळेत घातले. मात्र या शाळेत शिक्षकच नसल्याने मुले घरी आल्यानंतरही काहीत अभ्यास करीत नाहीत. -राजाराम कांबळे, पालक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहिली ते सातवीपर्यंतची सुविधा असलेल्या या शाळेत ५६० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तीन वर्षांपूर्वी शाळा सुरू झाल्यानंतर प्रवेशासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.