लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: अंधेरीतील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलात नियम धाब्यावर बसवून अनियमितता सुरू असून कोणाच्या तरी बालहट्टापायी येथील मैदान सहा महिन्यांकरिता फुटबॉलसाठी आरक्षित केल्याचा आरोप आमदार अमित साटम यांनी केला आहे. स्थानिक मराठी माणसांसाठी हे संकुल खुले करावे, अशी मागणी साटम यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह यांना पत्र पाठवून केली आहे.

अंधेरी येथील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाला (अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स) साटम यांनी मंगळवारी भेट देऊन पाहणी केली. मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. क्रीडा संकुलात अनियमितता होत असल्याचा आरोप साटम यांनी केला आहे. सामने किंवा शूटिंग सुरू असताना स्थानिक रहिवाशांना मैदानात चालण्यासाठी मनाई केली जाते. येथील जलतरण तलावाचे दर मुंबई महानगरपालिकेने ठरवलेल्या दरापेक्षा विसंगत आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने ठरवलेल्या दरानेच जलतरण तलावासाठी शुल्क आकारणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. येथील कंत्राटदाराची मुदत संपली असून तो येथील सोयी – सुविधांचा वापर करून फायदा लाटत आहे. त्यामुळे पारदर्शक पद्धतीने नव्याने निविदा काढावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. तसेच या ठिकाणच्या खोल्यांचे आरक्षण थेट मुंबई महानगरपालिकेने करावे. फक्त सभागृहासाठी खुल्या पारदर्शक पद्धतीने निविदा काढून कंत्राटदार नियुक्त करावा, मध्यमवर्गीय मराठी माणसाला अंधेरी या क्रीडा संकुलातील सोयी – सुविधापासून वंचित ठेवू नये. ज्या दिवशी सामने किंवा शूटिंग सुरू असेल त्या दिवशी स्थानिक रहिवाशांना मैदानात चालण्यासाठी मनाई करू नये अशीही मागणी त्यांनी केली आहे.

आणखी वाचा- उपकरप्राप्त इमारतींचे ९० टक्क्यांहून अधिक पावसाळापूर्व सर्वेक्षणाचे काम पूर्ण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोणाचा बालहट्ट?

मुंबई महानगरपालिकेने हे मैदान बहुउद्देशीय वापरासाठी उपलब्ध केले आहे. गेली काही वर्षे हे मैदान केवळ फुटबॉलसाठी आरक्षित केले आहे, असा सूचक आरोप साटम यांनी कोणाचेही नाव न घेता केला आहे. फुटबॉलसाठी कोणतेही मैदान आरक्षित व्हावे याबाबत आम्हाला हरकत नाही. मात्र, कुणाच्या तरी बालहट्टासाठी हे मैदान ‘मुंबई सिटी फुटबॉल एफसी’ या क्लबकरिता नाममात्र शुल्कात सहा महिन्यांसाठी आरक्षित केले आहे. सहा महिन्यात केवळ २० ते २५ दिवस सामने होतात, तर २० ते २५ दिवस शूटिंगसाठी हे मैदान दिले जाते. त्यामुळे केवळ सहा महिन्यात ५० दिवस हे मैदान वापरले जाते. हे बहुउद्देशीय संकुल मध्यमवर्गीय मराठी माणसाकरिता मुंबई महानगरपालिकेने सुरू केले होते. जर केवळ फुटबॉलसाठी हे मैदान आरक्षित करायचे असेल तर मुंबई शहरातील सर्व फुटबॉल खेळाडूंसाठी हे मैदान खुले केले पाहिजे. फक्त मुंबई सिटी एफसी यांच्यासाठी आरक्षित करू नये, असेही ते म्हणाले.