scorecardresearch

‘ऑपरेशन गोल्डन डॉन’अंतर्गत ५१ कोटींचे सोने जप्त; सुदानच्या ७ नागरिकांसह १० जणांना अटक; मुंबईत चार ठिकाणी छापे

या कारवाईत ७४ लाख परदेशी चलन व ६३ लाख भारतीय चलनही जप्त करण्यात आले.

gold smuggling in Mumbai
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

मुंबई : महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) सोन्याच्या तस्करीविरोधात देशभर ‘ऑपरेशन गोल्डन डॉन’ ही विशेष मोहीम राबवून सात सुदान देशाच्या नागरिकांसह एकूण १० जणांना अटक केली. याप्रकरणी मुंबईतील कुलाबा आणि झवेरी बाजार या चार ठिकाणांसह अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत एकूण १०१ किलो सोने व एक कोटी ३७ लाखांचे भारतीय व परदेशी चलन जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत ५१ कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

आरोपी भारत व नेपाळ सीमेवरून सोन्याची तस्करी करत होते. तस्करीचे सोने रेल्वेने किंवा बसद्वारे मुंबईत आणले जायचे. अटक आरोपींमध्ये कुलाबा येथील दोन भावांचाही समावेश आहे. ते दोघे परदेशी तस्करांकडून सोने खरेदी करून झवेरी बाजारमधील व्यापाऱ्यांना विकायचे.

डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी १९ फेब्रुवारीला रात्री उशिरा पाटणा रेल्वे स्थानकावरून तीन सुदान देशाच्या नागरिकांना ताब्यात घेतले. आरोपी मुंबईला जाणार होते. त्यांतील दोन सुदान देशातील नागरिकांकडून ४० पाकिटांमध्ये ३७ किलो १२६ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. आरोपींनी त्यासाठी विशेष जॅकेट तयार करून त्यातील छुप्या कप्प्यामध्ये सोने लपवले होते. तिसरा आरोपी तस्करांशी समन्वय ठेवणे व वाहतुकीची व्यवस्था करणे अशी कामे करत होता. याच विशेष मोहिमेअंतर्गत दोन सुदान देणाऱ्या नागरिक असलेल्या महिलांना पुण्यात पकडण्यात आले. त्या हैद्राबाद येथून मुंबईत बसने प्रवास करून येत होत्या. त्यांच्याकडून पाच किलो ६१५ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले.

 तिसऱ्या कारवाईत पाटण्याहून मुंबईला जाणाऱ्या दोन सुदानी नागरिकांचा  सोमवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे अडवण्यात आले. त्याच्यांकडील ४० पाकिंटांमध्ये ३८ किलो ७६० ग्रॅम सोने सापडले. आरोपींनी कमरेला बांधलेल्या कोटात सोने लपवले होते. त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे डीआरआयने कुला व झवेरी बाजार येते चार ठिकाणी छापे मारले. त्यात सुमारे २० किलो २०० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. या कारवाईत ७४ लाख परदेशी चलन व ६३ लाख भारतीय चलनही जप्त करण्यात आले.

आरोपींच्या चौकशीत कुलाबा येथील दोन भाऊ सैफ सय्यद खान आणि त्याचा भाऊ शमशेर सुदानी तस्करांकडून सोने खरेदी करून झवेरी बाजार येथील सोन्याचे व्यापारी मनीष प्रकाश जैन यांना विकत असल्याचे निष्पन्न झाले. या तीन आरोपीकडे यापूर्वी तस्करी करून आणलेले सोने असल्याचा संशय असून त्याबाबत त्यांची चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई विमानतळावरून साडेआठ कोटीचे परदेशी चलन जप्त

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत परदेशी चलनासह अमेरिकेच्या पारपत्रावर प्रवास करणाऱ्या प्रवाशाला अटक केली. आरोपींकडून आठ कोटी ३६ लाख रुपयांचे परदेशी चलन जप्त करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. पूनम सोमबाया(५३) असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपीने बॅगेत परदेशी चलन लपवले होते. त्यात १० लाख अमेरिकन डॉलर, ३७ सिंगापूर डॉलर सापडले. त्यानंतर सीमाशुल्क कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-02-2023 at 02:03 IST
ताज्या बातम्या