विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) मुंबईत भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकारपरिषदेत बोलताना महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. तसेच, राज्य सरकारकडून आज आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर भाजपाने बहिष्कार का टाकला, यांचं कारण देखील सांगितलं.

फडणवीस म्हणाले, “आज राज्याच्या गृहमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीचं निमंत्रण आम्हाला दिलं होतं. परंतु ज्या काही घटना मागील चार-पाच दिवस आम्ही मुंबई आणि महाराष्ट्रात पाहतोय, त्या घटना बघितल्यानंतर या सरकारने संवादासाठी जागा ठेवलीय असं आम्हाला वाटत नाही. जर कोणी हिटलरी प्रवृत्तीनेच वागायचं ठरवलं असेल, तर मग त्यांच्याशी संवादापेक्षा संघर्ष केलेला बरा. अशाप्रकारची आमची मानसिकता झाल्यामुळे आम्ही आजच्या बैठकीवर बहिष्कार घातला आहे.”

मग अशा परिस्थितीत अशा बैठकीत जाऊन फायदा काय? –

तसेच, “मुळातच विरोधी पक्षाला जीवानिशी संपवायचं अशाप्रकारची प्रवृत्ती जर सरकारची असेल आणि सरकारी पक्षाचे लोक पोलीस संरक्षणात आमच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना जीवे मारण्यासाठी पोलिसांच्या समक्ष हल्ले करणार असतील आणि त्यानंतरही त्यासंदर्भात एफआयआर नोंदवण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल, तर मग अशा परिस्थितीत अशा बैठकीत जाऊन फायदा काय?” असंही फडणवीसांनी यावेळी म्हटलं

…हा गैरसमज त्यांनी मनातून काढून टाकावा –

याचबरोबर,“महाराष्ट्रात अशी परिस्थिती आम्ही कधीच बघितील नाही की सरकार पक्षाचे लोक, पोलीस संरक्षणात विरोधी पक्ष आपल्या भ्रष्टाचारावर बोलतो म्हणून जीवे मारण्याकरता हल्ला करत आहेत. आम्ही पोलखोल यात्रा काढली, या यात्रेच्या माध्यामातून मुंबई महापालिकेतील सगळा भ्रष्टाचार हा आम्ही जनतेसमोर मांडला. लोकशाहीत यापेक्षा वेगळं काय करायचं असतं? पण ज्यांना लोकशाही मान्य नाही त्यांनी आमच्या पोलखोल सभांवर हल्ला केला. आमच्या पोलखोल रथावर हल्ला केला आणि त्यांना असं वाटतय, की अशाप्रकारचे हल्ले करून आम्ही भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलणं बंद करू, हा गैरसमज त्यांनी मनातून काढून टाकावा. भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढाई सुरूच राहील.” असंही फडणवीस यावेळी ठाकरे सरकारला उद्देशून म्हणाले.

जे काही मुंबईत सुरू आहे ते मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर सुरू आहे –

तर, “ज्या प्रकारे किरीटी सोमय्यांवर हल्ला झाला. पोलिसांच्या समक्ष झेड सुरक्षा असलेल्यावर हल्ला केला जातो. मोहीत कंबोज यांच्यावर मॉब लिंचिंगचा प्रयत्न झाला. या सगळ्या गोष्टी आपण जर बघितल्या तर, आणि हे मुंबईतच सुरू आहे असं नाही. राज्यात सर्वदूर भाजपाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना लक्ष्य करून, त्यांच्यावर केसेस नोंदवल्या जात आहेत. मग कधी प्रवीण दरेकारांवर केस टाकली जाते, उच्च न्यायालायाने दिलासा दिला तर उच्च न्यायालयावर आरोप केला जातो. इतक्या खालच्या स्तरावर आता ही नेते मंडळी पोहचली आहे. रणजीतसिंग नाईक-निंबाळकरांविरोधात आठ खोट्या तक्रारी केल्या गेल्या, एकाही तक्रारीत दम नाही. पोलिसांचा दुरुपयोग हा मोठ्याप्रमाणावर चालला आहे आणि हा दुरुपयोगच आहे कारण यांची एकही केस टिकली नाही, टिकूच शकत नाही. कारण, धादांत खोट्या केसेस टाकणं सुरू आहे. गृहमंत्र्यांच्या बैठकीला जाऊन फायदा तरी काय? या गृहमंत्र्यांना काही अधिकार तरी आहेत का? जे काही मुंबईत सुरू आहे ते मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर सुरू आहे. त्यामुळे ज्या बैठकीला मुख्यमंत्रीच नाही त्या बैठकीत गृहमंत्री आम्हाल बोलावून काय करणार आहेत? आणि कोणता निर्णय घेणार आहेत? इतक्या महत्वाच्या बैठकीला मुख्यमंत्रीच राहत नाही तर ही बैठक म्हणजे निव्वळ टाईमपास आहे का? असा आमचा सवाल आहे.” असंही फडणवीसांनी यावेळी बोलून दाखवलं.