‘वक्ता दशसहस्रेषु’ स्पर्धेने आम्हाला घडविले!

गतवर्षीच्या विजेत्या वक्त्यांचे मत

गतवर्षीच्या विजेत्या वक्त्यांचे मत

जिद्द, उत्साह, विषयांवरील पकड आणि आत्मविश्वासाची भरारी घेत ‘लोकसत्ता’च्या ‘वक्ता दशसहस्रेषु’ स्पर्धेत गेल्या वर्षी महाअंतिम फेरीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मिळालेला अनुभव पुढील आयुष्यासाठीही महत्त्वपूर्ण ठरणार आहे, ही बाब त्यांच्याशी संवादातून समोर आली. वक्तृत्वाचे सादरीकरण करताना वाचनाची जोड असेल तर विषयाची मांडणी अधिक सर्वसमावेशक होते. मार्गदर्शनपर कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या बारीकसारीक चुकांची जाणीव करून देण्यात आल्याने या स्पर्धेत सहभागी झाल्याचा फायदा आम्हाला पुढील स्पर्धाबरोबर दैनंदिन जीवनातही झाल्याचे मत गतवर्षीच्या विजेत्या वक्त्यांनी मांडले.

राजकीय विषयांवर मांडणी करण्यासाठी वेगळे कौशल्य हवे असते. मुद्देसूद आणि दर्जेदार वक्तृत्व, सादरीकरणासाठी वाचनाची जोड असावी लागते. स्पर्धेच्या संपूर्ण प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना वैचारिक खाद्य मिळाले. ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या कार्यशाळेत मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे माझ्या वाचनाला दिशा मिळाली.

– अर्चना राजपूत, औरंगाबाद

 

स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंतचा अनुभव अविस्मरणीय होता. भाषण करताना एकाच अक्षराचे होणारे वेगवेगळे उच्चार यासारख्या महत्त्वाच्या मुद्दय़ावरही कार्यशाळेत मान्यवरांनी प्रकाश टाकला. विविध विषयांवरील वाचन करावे असा सल्ला मान्यवरांनी दिला.मान्यवरांसमोर वक्तृत्व सादर करताना आत्मविश्वास द्विगुणित झाला.

– हृषीकेश डाळे, रत्नागिरी

स्पध्रेतून बाहेर पडल्यानंतर समृद्धीची एक पायरी वर चढल्यासारखे वाटत आहे. वक्तृत्व स्पर्धाना नृत्य आणि संगीत स्पर्धासारखे ग्लॅमर मिळवून देण्याचे श्रेय ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्र्ोषु’ स्पध्रेला जाते. याशिवाय स्पर्धकांसाठी आयोजित कार्यशाळेतूनही भन्नाट अनुभव माझ्या गाठीशी बांधले गेले आहेत, ज्याचा उपयोग आजही होतो.

– रिद्धी म्हात्रे, ठाणे. 

 

याआधी मी राष्ट्रीय स्तरावरील वक्तृत्व स्पर्धामध्ये सहभागी झाले होते. मात्र या स्पध्रेमधील विषयांची तफावत मला प्रकर्षांने जाणवली. माणसाने सगळ्या बाजूंनी विचार करून विषय मांडावेत असे विषय ‘लोकसत्ता’च्या स्पध्रेमध्ये असतात.कार्यशाळेतून नुसते बोलणे आणि एखादे वक्तव्य करणे यांमधील फरक प्रकर्षांने जाणवला.

– भुवनेश्वरी परशुरामकर, नागपूर

 

ही स्पर्धा इतर वक्तृत्व स्पर्धासारखी अजिबात नाही. तिला तिच्या विषयांच्या श्रीमंतीची ठेवण असून इतर स्पध्रेत आम्ही जसे विषयाची मांडणी करून वक्तृत्व करतो तसे इथे करू शकत नाही. ‘लोकसत्ता’ वक्तृत्व स्पध्रेचे विषय हाच एका प्रकारचा अभ्यास आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने आपण कुठे आहोत आणि कुठपर्यंत पोहोचायचे आहे याची जाणीव झाली.

– निखिल कुलकर्णी, पुणे

 

‘वक्ता दशसहस्रेषु’ या स्पर्धेत आयोजित केलेल्या कार्यशाळेतून विषयाची मांडणी करताना कुठल्या गोष्टींकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे, याची माहिती मिळाली. त्याशिवाय विषयाच्या अनेक बाजू लक्षात घेऊन त्यांची मांडणी करण्याची गरज असते याबाबतचे मार्गदर्शन पुढील वक्तृत्व स्पर्धासाठी उपयुक्त ठरले.

– आदित्य जंगले, मुंबई

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Oratory competition