मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कमला मिल अग्नितांडवाप्रकरणी हॉटेल मालकांवर कारवाई होणारच असे म्हटले आहे. तसेच ज्या महापालिका अधिकाऱ्यांनी इथल्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केले त्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी जाणीवपूर्वक परवाने दिल्याचे निदर्शनास आले तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात येतील असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कमला मिल कंपाऊंड परिसराला भेट दिली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हॉटेल मालकांवर कारवाईचे संकेत दिले. तसेच अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही गुन्हे दाखल करून कारवाई होईल असेही स्पष्ट केले आहे.

कमला मिलमध्ये झालेल्या या घटनेनंतर जी मुंबईत जी काही संशयित बांधकामे आहेत त्यांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करा. बांधकामे जर अनधिकृत असतील तर त्यावर खुशाल हतोडा चालवा असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. विनापरवाना हॉटेल्सही पाडा असेही त्यांनी सांगितले. कमला मिल अग्नितांडवात १४ बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेने मधुकर शेलार, धनराज शिंदे, महाले, पडगिरे आणि एस. एस. शिंदे या पाचजणांना निलंबित केले आहे.

‘१ अबव्ह’ या हॉटेल संदर्भात सामाजिक कार्यकर्ते इलियास इजाज खान यांनी सात महिन्यांपूर्वीच तक्रार केली होती. यानंतर आरोग्य विभागाने तपासणी करून अहवाल सादर केला. ज्यामध्ये हे हॉटेलचा काही बेकायदेशीररित्या बांधल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. आरोग्य विभागाचे निरीक्षक पी. एम. शिर्के यांनी ‘१ अबव्ह’ चे हॉटेल मालक कृपेश संघवी यांना जुलैमध्येच हॉटेलचा अनधिकृत भाग ७ दिवसात पाडण्याचे आदेश दिले होते. मात्र हॉटेलचा हा भाग न पाडताच ते सुरू होते. आज अखेर मुख्यमंत्र्यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.