दत्तात्रय पडसलगीकर यांची ग्वाही
मुंबईवर दहशतवादाची कायमच टांगती तलवार राहिली आहे. मुंबईकरांच्या सुरक्षिततेला प्राधान्य हेच आपले पहिले काम असणार आहे, असे मुंबईचे ४०वे पोलीस आयुक्त दत्तात्रय पडसलगीकर यांनी रविवारी स्पष्ट केले. आयसिसचा वाढता धोका लक्षात घेऊन तरुणांमधील धर्माधता कमी करण्यासाठी समाजातील बुद्धिजीवी मंडळींची मदत घेऊ, तसेच राज्याच्या दहशतवादविरोधी विभागाला सोबत घेऊन हा धोका कमी करण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही पडसलगीकर यांनी दिली.
सौदी अरेबियाचे नवे राजदूत आणि मावळते आयुक्त अहमद जावेद यांच्याकडून रविवारी पडसलगीकर यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. पदभार स्वीकारल्यानंतर संवाद साधताना ते म्हणाले की, देशात कुठेही काहीही अनुचित घटना घडली तरी त्याची प्रतिक्रिया मुंबईत उमटते. मुंबईतील गुन्हेगारीची पद्धतही काळानुरूप बदलली आहे. सायबर गुन्हे तसेच आर्थिक गुन्ह्य़ांमध्ये विशेषत: पॉन्झी योजनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांची फसवणूक होत आहे. याविरुद्ध जोरदार मोहीम आखण्याचा आपला प्रयत्न राहील. आधीच्या आयुक्तांनी ज्या चांगल्या योजना राबविल्या त्या आपण सुरू ठेवणार आहोत, असे पडसलगीकर यांनी सांगितले.
नागरिकांशी सुसंवाद
नागरिकांशी अधिकाधिक संवाद साधला जावा यासाठी काय करता येईल, या दिशेनेही प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांच्या सुरक्षेवर भर देण्यात येईल. सुरक्षेसाठी सध्या जी पद्धत आहे त्यात काही सुधारणा करता येतील का, या दिशेने विचार करणार असल्याचेही पडसलगीकर यांनी सांगितले.