मुंबई : महाराष्ट्रातील पारंपरिक वस्त्र व सुंदर विणकामाचा अविष्कार असलेली पैठणी आता लंडनच्या ‘व्हिक्टोरिया अल्बर्ट’ संग्रहालयामध्ये प्रदर्शित होणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार यांनी केलेली विनंती संग्रहालयाने मान्य केली आहे. पैठणीबरोबरच पुढील काळात हातमागावरील वस्त्रांचे प्रदर्शनही संग्रहालयामध्ये करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. मराठा सरदार रघुजीराजे भोसले यांची ऐतिसाहिक तलवार ताब्यात घेण्यासाठी शेलार हे सध्या लंडन दौऱ्यावर आहेत. त्यांनी मंगळवारी लंडनच्या प्राचीन व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयाला भेट दिली. या वेळी संग्रहालयाचे संचालक मिस्टर हंट आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक असलेली वाघनखे आपल्याला तीन वर्षांसाठी कर्जरुपाने (लोन) मिळालेली आहेत आणि ती परत करावी लागतील. परंतु पुढील काळात या संग्रहालयातील अन्य महत्त्वाच्या गोष्टी दीर्घकाळासाठी कर्जरुपाने मिळाव्यात, यासंदर्भात हंट यांच्याशी चर्चा झाल्याचे शेलार यांनी सांगितले. मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) राज्य वस्तुसंग्रहालय उभारणार आहे, त्यासाठी सल्लागार तज्ज्ञ म्हणून व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम आपल्याला सहकार्य करेल. यासंदर्भात करार करण्याच्या दृष्टीनेही सांस्कृतिक विभाग काम करीत असल्याचे शेलार यांनी नमूद केले.