जम्मू-काश्मीरला स्वायत्तता देण्यासाठी निर्माण केलेले ३७० हे कलम रद्द झालेच पाहिजे. तसेच पाकव्याप्त काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागासह संपूर्ण जम्मू-काश्मीर जोपर्यंत आपले होत नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच राहणार, असे स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फ डणवीस यांनी केले. तर हे कलम रद्द करण्याबाबत देशभर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री डॉ. निर्मल सिंह यांनी व्यक्त केली.
काश्मीरसाठी बलिदान देणाऱ्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा स्मृतिदिन ‘बलिदान दिन’ म्हणून पाळण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून देशासाठी, समाजासाठी आपल्या माध्यमातून ठाम भूमिका घेत झगडणाऱ्या व्यक्तीला डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नावाने स्मृती पुरस्कार देण्याचा निर्णय डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्मृती फाऊंडेशनने घेतला. हा पुरस्कार ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात मंगळवारी झालेल्या या सोहळ्याला डॉ. निर्मल सिंह यांची विशेष उपस्थिती होती. सोहळ्याचे स्वागताध्यक्ष मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अॅड. आशीष शेलार, जयवंतीबेन मेहता, आमदार पराग अळवणी, आमदार भाई गिरकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जीसारख्या समाजधुरिणाने केलेल्या बलिदानामुळे जम्मू-काश्मीरची भूमी आपल्या देशाशी जोडलेली राहिली असली तरी ३७० व्या कलमामुळे आजही ती सुरक्षित नाही. जोपर्यंत हे कलम आहे तोपर्यंत काश्मीरचे लचके तोडण्यासाठी इतर देशांना प्रोत्साहन मिळत राहील. त्यामुळे हे कलम रद्द झालेच पाहिजे, अशी मागणी फ डणवीस यांनी केली.
देशभरातील संस्थानांचे विलीनीकरण करताना काश्मीरच्या बाबतीत सुरुवातीपासूनच वेगळा निर्णय घेण्यात आला. संविधानाच्या कक्षेत राहून निर्णय घेणे शक्य होते. मात्र, कॉंग्रेसने सगळी सत्ता शेख अब्दुल्लांच्या हातात देत ३७० व्या कलमान्वये काश्मीरला स्वतंत्र दर्जा दिला. त्याचे परिणाम आजही काश्मिरी जनतेला भोगावे लागत आहेत. या कलमाची खरोखरच गरज उरली आहे का, यावर चर्चा व्हायला हवी, असे मत डॉ. निर्मल सिंह यांनी व्यक्त केले.
पर्यटकांसाठी आणि बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी काश्मीर खोरे अत्यंत सुरक्षित असल्याची ग्वाही त्यांनी दिली. काश्मीरमध्ये सध्या दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण हे छोटय़ा-मोठय़ा अपघातांसारखे असून लवकरच तेही संपुष्टात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
बांधिलकी वाचकांशी हवी, विचारसरणीशी नव्हे -कुबेर
सध्या वाचकांपेक्षा विचारसरणीला महत्त्व देण्याची प्रथा रूढ झाली आहे. त्यामुळे पत्रकारितेचे मोठे नुकसान झाले असून, तिच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पत्रकारांची बांधिलकी ही कायम वाचकांशीच असली पाहिजे, असे ठाम मत कुबेर यांनी यावेळी व्यक्त केले.
श्यामाप्रसाद मुखर्जी पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्वीकारताना ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर. यावेळी व्यासपीठावर जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री डॉ. निर्मल सिंह, आमदार अॅड. आशीष शेलार उपस्थित होते.