मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) पानबाई शाळा – वाकोला नाला उन्नत रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याची अपेक्षा होती. उलटपक्षी उन्नत रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढली आहे. तर दुसरीकडे उन्नत रस्ता संपतो त्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरील पानबाई शाळा येथील वाहतूक कोंडीत आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे एमएमआरडीएवर टीका होत आहे. त्यामुळे आता पानबाई शाळेजवळील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुंबई महानगरपालिका, एमएमआरडीए आणि वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेतला आहे.

पालिकेकडून पानबाई शाळा,आग्रीपाडा येथे उत्तरेच्या दिशेने एक मार्गिका वाढविण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. १०० ते १५० मीटरची ही मार्गिका तयार झाल्यास येथील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. मात्र यासाठी दोन महिने वाट पाहावी लागणार आहे. कारण पालिकेचे काम पूर्ण होण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

सांताक्रुझ – चेंबूर जोडरस्त्यावरून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाकोला येथे अतिजलद पोहचण्यासाठी एमएमआरडीएने जोडरस्ता विस्तारीकरण प्रकल्पाअंतर्गत कपाडिया नगर – वाकोला दरम्यान ३.०३ किमी लांबीचा उन्नत रस्ता बांधला आहे. यातील १.०२ किमीच्या शेवटच्या वाकोला नाला – पानबाई शाळा उन्नत रस्त्याचे लोकार्पण १४ ऑगस्ट रोजी करण्यात आले. हा टप्पा सुरू झाल्याने अमर महल जंक्शन – पानबाई शाळा, पश्चिम द्रुतगती महामार्ग प्रवास केवळ ३५ मिनिटांत होईल असा दावा केला जात होता. मात्र प्रत्यक्षात पश्चिम द्रुतगती मार्गावरील या उन्नत रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहेच, पण त्याचबरोबर उन्नत रस्ता संपतो तिथे अर्थात पानबाई शाळेजवळील वाहतूक कोंडीत आणखी भर पडली आहे. त्यामुळे अंधेरी, बोरिवलीच्या दिशेने जाणारे प्रवासी त्रस्त झाले आहेत.

महत्त्वाचे म्हणजे वाकोला येथे पश्चिम द्रुतगती मार्गावर वाकोला उड्डाणपुलावर आणि उन्नत रस्त्यावर सायंकाळी गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे एमएमआरडीएवर टीका होत आहे. वाहतूक कोंडीच्या तक्रारी वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सहपोलीस आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे, एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पानबाई शाळा येथील वाहतूक कोंडीची पाहणी करून या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा केली. तर पालिकेकडून हाती घेण्यात आलेल्या आग्रीपाडा येथील एका मार्गिकेच्या विस्तारीकरणाच्या कामाचाही आढावा घेतला.

उन्नत रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांना पुढे सुकरपणे अंधेरी, बोरिवलीच्या दिशेने जाता यावे यासाठी पानबाई शाळा येथे एका मार्गिकेचा विस्तार करणे आवश्यक होते. त्यानुसार याची जबाबदारी पालिकेकडे देण्यात आली आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावरील एका मार्गिकेचा १०० ते १५० मीटरने विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण पावसाळ्यात काम सुरू करता न आल्याने मार्गिकेचा विस्तार झाला नाही आणि दुसरीकडे मात्र उन्नत रस्ता सुरू झाल्याने पानबाई शाळा येथे वाहतूक कोंडी आणखी वाढली आहे. पण आता मात्र या मार्गिकेचा तातडीने विस्तार करणे गरजेचे असून मार्गिकेच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याची माहिती पालिकेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली. दोन महिन्यांत हे काम पूर्ण होईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पानाबाई शाळेजवळील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी प्रवाशांना दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.