scorecardresearch

संकटकाळी मदतीसाठी रेल्वे फलाटांवर ‘पॅनिक बटन’ ;मुंबई विभागातील ७९ स्थानकांत अत्याधुनिक सीसीटीव्ही;  ‘रेलटेल’कडून कंपनीची नियुक्ती 

‘रेलटेल’च्या मदतीने सर्व स्थानकात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा नियंत्रण कक्षही उभारण्यात येणार आहे.

मुंबई : संकटकाळात प्रवाशांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी रेल्वे स्थानकातील फलाटांवर ‘पॅनिक बटन’ बसवण्यात येणार आहेत. देशभरातील ७५६ स्थानकांपैकी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील ७९ स्थानकांचाही यात समावेश आहे. त्याचबरोबर ‘रेलटेल’च्या मदतीने देशभरातील ७५६ रेल्वे स्थानकात अत्याधुनिक दूरदृश्य देखरेख प्रणाली (व्हिडीओ सव्‍‌र्हिलन्स सिस्टिम) कार्यरत करण्यात येणार. यामध्ये गर्दीत चेहरे ओळखणारे कॅमेरे बसवण्यात येणार असून त्यामुळे ‘रेकॉर्ड’वरील (अभिलेखावरील) गुन्हेगारांना पकडण्यास मदत होणार आहे.

रेल्वे स्थानकातील फलाटावर पॅनिक बटण यंत्रणाही बसवण्यात येणार असल्याची माहिती ‘रेलटेल’कडून देण्यात आली. यात प्रत्येक फलाटावर दोन पॅनिक बटन असतील.

‘रेलटेल’च्या मदतीने सर्व स्थानकात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा नियंत्रण कक्षही उभारण्यात येणार आहे. सध्या तीन ते चार स्थानकांचा मिळून एक नियंत्रण कक्ष आहे. त्या नियंत्रण कक्षात मोठे पडदे ( स्क्रीन) असतील व स्थानकातील सर्व बाजू यात कैद होतील. एखादी घटना घडल्यास याद्वारे पाहूून त्वरित सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्याला घटनास्थळी पोहोचता येईल किंवा तेथे पाठवता येणार आहे.

नवीन प्रणालीअंतर्गत अत्याधुनिक असे ‘सीसीटीव्ही कॅमेरा’ बसवण्यात येणार आहेत. रेल्वे स्थानकांचे प्रवेशद्वार, फलाट, पादचारी पूल, तिकीट खिडक्या, प्रतीक्षालय, मेल-एक्स्प्रेस आरक्षण खिडक्या, वाहनतळ आदी ठिकाणी कॅमेरे बसवितानाच त्यावर नियंत्रण कक्षामार्फत देखरेख होईल.

या कॅमेऱ्यांमध्ये गर्दीत चेहऱ्यांची ओळख पटविणारे कॅमेरे बसवण्यात येतील. या कॅमेऱ्यांचा वापर रेल्वे हद्दीत येणाऱ्या प्रामुख्याने अभिलेखावरील गुन्हेगारांचे चेहरे ओळखून त्यांना पकडण्यासाठी होणार आहे. यासाठी रेल्वे पोलीस आणि शहर पोलिसांच्या मदतीने अभिलेखावरील गुन्हेगारांची छायाचित्रासह माहिती या कॅमेऱ्यात साठवावी लागणार आहे. जानेवारी २०२३ पर्यंत ही प्रणाली बसविली जाईल, अशी माहिती देण्यात आली.

या स्थानकात सुविधा

ऐरोली, अंबरनाथ, आंबिवली, आसनगाव, बदलापूर, बेलापूर, भांडुप, भिवपुरी रोड, भायखळा, चेंबूर, चिंचपोकळी, चुनाभट्टी, कॉटर्न ग्रीन, करी रोड, दिवा, डॉकयार्ड रोड, डोलवली, डोंबिवली, घणसोली, घाटकोपर, गोवंडी, गुरू तेज बहादूर नगर, इगतपुरी, जुईनगर, कळवा, कांजुरमार्ग, कर्जत, कसारा, केलवली, खडवली, खांदेश्वर, खर्डी, खारघर, खोपोली, किंग्ज सर्कल, कोपर, कोपरखैरणे, लोणावळा, लौजी. मानखुर्द, मानसरोवर, मशीद रोड, माथेरान, माटुंगा, मुलुंड, मुंब्रा, नाहूर, नेरळ, नेरुळ, पळसदरी, पनवेल, परेल, रबाळे, रे रोड, सॅन्हडस्र्ट रोड, सानपाडा, सीवूड दारावे, शिवडी, शहाड, शेलू, सायन, ठाकुर्ली, टिळकनगर, टिटवाळा, तुर्भे, उल्हासनगर, वडाळा रोड,वांगणी, वाशी, वाशिंद, विद्याविहार, विक्रोळी आदी स्थानकांचा समावेश आहे.

नवे काय

संकटकाळात ‘पॅनिक बटन’ दाबल्यास त्वरित त्या फलाटावरील सीसीटीव्ही

यंत्रणाही कार्यरत होईल. हे कॅमेरे दिशा बदलून त्वरित वळतील आणि तेथील घटना कॅमेऱ्यात कैद करून एक भोंगा (अलार्म) वाजेल. त्यामुळे स्थानकातील नियंत्रण कक्षातही पडद्यावर दिसेल आणि तात्काळ प्रवाशांपर्यंत मदत पोहोचविणे शक्य होईल.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Panic button on railway platforms for emergency help zws

ताज्या बातम्या