scorecardresearch

परब यांना ईडी कारवाईपासून सोमवारपर्यंत दिलासा

दंडाधिकाऱ्यांनी गुन्ह्यांची दखल घेण्याआधीच ईडीने या प्रकरणी कारवाई सुरू केल्याची बाबही या वेळी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

anil parab ed
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मुंबई : दापोली येथील साई रिसॉर्टप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सुरू केलेल्या कारवाईपासून ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांना उच्च न्यायालयाने मंगळवारी २० मार्चपर्यंत अंतरिम दिलासा दिला.

परब यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई न करण्याबाबतचे लेखी आदेश आम्ही देत नाही. परंतु परब यांच्यावर कठोर कारवाई न करण्याचे अतिरिक्त महान्याय अभिकर्ता अनिल सिंह यांनी ईडी अधिकाऱ्यांना कळवावे, असे न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने यावेळी स्पष्ट केले. पर्यावरण संरक्षण कायदा, सागरी किनारा क्षेत्र नियमावली आणि भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० नुसार फसवणूक केल्याच्या आरोपाप्रकरणी दाखल तक्रारीच्या ईडीने प्रकरण नोंदवले आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रिसॉर्टचे मालक सदानंद कदम यांच्या अटकेबाबत ट्विट केल्यानंतर तातडीने दिलासा मिळावा यासाठी आपण न्यायालयात धाव घेतल्याचे परब यांच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. सोमय्या यांनी त्यांच्या ट्विटमध्ये परब यांना आता अटक होणार असल्याचे सूचित केले होते. दंडाधिकाऱ्यांनी गुन्ह्यांची दखल घेण्याआधीच ईडीने या प्रकरणी कारवाई सुरू केल्याची बाबही या वेळी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-03-2023 at 00:02 IST
ताज्या बातम्या