कळव्याजवळील बोगद्याच्या थेट माथ्यावर दोन शाळा भरत असल्यानेही धोका गहिरा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंब्य्राच्या डोंगरावरील अनधिकृत बांधकामे, त्या वस्त्यांमधून पडणारा कचरा आणि सांडपाणी यामुळे मध्य रेल्वेच्या पारसिक बोगद्याला धोका निर्माण झाला असून मंगळवारी या बोगद्याच्या कल्याणच्या बाजूच्या तोंडावरील संरक्षक भिंतीवर दरड कोसळल्याने या धोक्याचे गांभीर्य उघडकीस आले. मात्र या बोगद्याच्या कळव्याच्या बाजूच्या तोंडावर अशी कोणतीही संरक्षक भिंतच नसल्याने पारसिक बोगदा मध्य रेल्वेसाठी अद्यापही धोकादायकच आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी दोन शाळाही आहेत आणि रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या वस्त्यांमधून त्या शाळांमध्ये जाण्यासाठी रस्ताही आहे.

पारसिक बोगद्याचे गळणारे छत आणि त्यामुळे संरचनेला असलेला धोका तसेच बोगद्याच्या आसपासचे कचऱ्याचे डोंगर आणि त्यामुळे रेल्वे वाहतुकीला असलेला धोका, यावर ‘लोकसत्ता’ने याआधीही प्रकाश टाकला होता. मंगळवारच्या पावसामुळे कल्याण बाजूकडील बोगद्यावरील कचरा आणि माती यांचा भराव धसला आणि संरक्षक भिंतीमुळे तो रेल्वे रुळांवर पडता पडता राहिला. पण या संरक्षक भिंतीला दरडीमुळे तडा गेल्याने ती भिंत पाडण्यात आली.

बुधवारी महापालिकेने कळव्याच्या बाजूकडील कचराही साफ करण्याची मोहीम हाती घेतली. मात्र तेथील बोगद्यावरचा भाग धसला, तर तो भराव रुळावर येण्यासाठी संरक्षक भिंतीची आडकाठी नाही. विशेष म्हणजे या बाजूला बोगद्याच्या अगदी वर दोन शाळा आहेत. भास्करनगर आणि वाघोबानगर या दोन वस्त्यांतील लोक या बोगद्यावरील चिंचोळ्या रस्त्यावरून ये-जाही करतात या दोन्ही शाळांच्या दुरुस्तीचे कामही नुकतेच झाल्याने धोका आणखी वाढला आहे.

* शाळेच्या ठिकाणी बोगद्यावरील भाग सपाट आणि मोकळा आहे. त्यापुढे दगडांची भिंत आहे.

* ती कोणतीही दरड रोखण्यासाठी निरुपयोगी आहे. ही भिंत उंच नसल्याने उतारावरून येणारे दगड थेट खालच्या सपाट भागातही पडतात.

* एखादा मोठी दरड पडली तर ती या सपाट भागावरूनही थेट रुळांवर येण्याची भीती आहे.

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parsik tunnel without the protective wall
First published on: 23-06-2016 at 02:26 IST