मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोरील ६०२ क्रमांकाची खोली अजित पवारांनी नाकारली आहे. या खोलीबाबत अनेक समज-गैरसमज असल्याने अजित पवारांनी ती नाकारली असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याचा अजित पवारांनी इन्कार केला असून पवार कुटुंबिय अंधश्रद्ध नाही, असे म्हटले आहे. तर मुख्यमंत्री कार्यालयाजवळील खोली मिळावी एवढीच आपली अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पवार म्हणाले, आधुनिक युगात अशा प्रकारचा विचार करणे हे अधोगतीचे लक्षण आहे. अशा गोष्टींना आजच्या विकसित जगात जगात थारा नाही. मुख्यमंत्री कार्यालयाच्या जवळ असेल अशी खोली आपल्याला हवी एवढेच आपण म्हटले होते, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे.

“पवार कुटुंब अंधश्रद्ध नाही. मी आणि शरद पवार यांनीही कधी असल्या अंधश्रद्धांवर विश्वास ठेवलेला नाही. उलट ही जागा यापूर्वी तीन मंत्र्यांनी वापरली आहे. मला त्या खोलीमध्ये कधीही कोणतेही बदल करायचे नव्हते. मी दुसरी खोली निवडली कारण याच्याजवळच मुख्य सचिवांची खोली आहे. तसेच जेव्हा मुख्यमंत्री एखादी तातडीची बैठक बोलावतील तेव्हा माझी खोली जवळ असल्यास मला तत्काळ बैठकीला उपस्थित राहता येईल. तसेच जेव्हा कॅबिनेटची बैठक असेल तेव्हा देखील माझ्यासाठी ते जास्त सोयीचं असेल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही खोली फडणवीस सरकारमध्ये सुरुवातीला कृषीमंत्री असलेले भाजपाचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांना २०१४ मध्ये ही खोली देण्यात आली होती. त्यानंतर जमीन घोटाळ्यात नाव आल्याने खडसेंना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर दुसरे भाजपा नेते पांडुरंग फुंडकर यांना हीच खोली देण्यात आली तर त्यांचा २०१८ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर २०१९ मध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर भाजपा नेते अनिल बोंडे यांना ही खोली देण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा ऑक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. या सर्व घडामोडींमुळेच मंत्रालयातल्या सहाव्या मजल्यावरील ही ६०२ क्रमांकाची खोली दुर्देवी असल्याची अंधश्रद्धा राजकीय वर्तुळात पसरली आहे.