कोटय़वधी रुपयांच्या सुशोभीकरणानंतरही तलावाची दुर्दशा
पर्यटक तसेच स्थानिक रहिवासी यांच्यासाठी विरंगुळय़ाचे केंद्र म्हणून सुशोभित करण्यात येत असलेल्या वांद्रय़ातील स्वामी विवेकानंद तलावाची व्यवस्थापनाअभावी दुर्दशा झाली आहे. एकीकडे, प्लास्टिकच्या वस्तू, कचरा, निर्माल्य टाकून तलाव प्रदूषित करण्यात येत असतानाच या तलावात अंघोळ करणे, कपडे धुणे, मासेमारी असे उद्योग सुरू आहेत. विशेष म्हणजे पालिका या तलावाच्या सुशोभीकरणासाठी जवळपास चार कोटी खर्च असताना तलावाची शोभा वाढण्याऐवजी विद्रूपीकरणच वाढत आहे.
वांद्रे येथील एस. व्ही. मार्गावरील ‘स्वामी विवेकानंद तलाव’ हा वांद्रे तलाव म्हणूनच प्रसिद्ध आहे. मुंबईत मध्यवर्ती, त्यातही वांद्रे स्थानकाजवळच असल्याने याठिकाणी सकाळ, संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. या पाश्र्वभूमीवर मुंबई महापालिकेनेही तलावाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला. यावर पालिकेने सुमारे ३ कोटी ७९ लाख रुपये इतका खर्च केला आहे. त्यात बांधकामासाठी ३ कोटी ६५ लाख, तर विद्युत उपकरणे आणि तत्सम खर्चासाठी ४० लाख, बागकामासाठी ४ लाख रुपये असा खर्च करण्यात आला आहे. तलावातील सुशोभीकरणाच्या योजनेत पर्यटकांना बसण्यासाठी कठडे, पथनाटय़ासाठी जागा, आजूबाजूला फुलझाडे, निर्माल्य कलश आणि लीली पाँडची व्यवस्था करण्यात आली आहे. तलावाच्या आजूबाजूला पामच्या ७० ते ८० झाडांचे कुंपण असणार आहे. सुशोभीकरणानंतर पालिकेकडे हे उद्यान सुपूर्द करणार असल्याची माहिती पालिका उपायुक्त शरद उघडे यांनी दिली.
मात्र एकीकडे पालिका तलावाचा परिसर सुशोभित करत असताना तलावाचे मात्र विद्रूपीकरण होत आहे. देखरेख व व्यवस्थापन नसल्यामुळे तलावात कचरा टाकण्याचे प्रमाण भरपूर आहे. तलावाच्या पाण्यात प्लास्टिकच्या गोण्या, थर्माकोलचे तुकडे, पाण्याच्या आणि काचेच्या बाटल्या तरंगताना दिसतात. तलावातील आतील व बाहेरच्या परिसरात अस्वच्छता असल्याने मोठय़ा अपेक्षेने तलाव परिसरात फिरण्याकरिता येणाऱ्या पर्यटकांचा विरस होतो आहे. तलावाच्या आजूबाजूच्या वस्तीतील रहिवासी अंघोळीकरिता तलावाच्या पाण्याचा वापर करतात. पदपथावर राहणारे लोक तलावाच्या पाण्यातच आपले रोजचे कपडे धुतात, भांडी घासतात. त्यांच्यावर वचक ठेवण्यासाठी महापालिकेचा कोणताही सुरक्षारक्षक तलाव परिसरात नाही. काही पर्यटक तलावात माशांना खाण्यासाठी पावाचे तुकडे टाकतात. त्यामुळेही तलावाचे पाणी खराब होते. त्यातच तलावातील मासे पकडून खाण्यासाठी किंवा विकण्यासाठी नेले जाते. पावसाळा हा माशांचा प्रजननाचा काळ असतो.

तलावात अशा पद्धतीने माशांना खायला पाव किंवा अन्य खाद्यपदार्थ टाकण्यात आले तर त्याचा परिणाम तलावाच्या जैवविविधतेवर होईल. माशांच्या पोटात पाव गेल्यानंतर तो मैद्याचा असल्याने फुगतो आणि कालांतराने मासे मृत पावतात. तलावाच्या पाण्यात कपडे धुतले जात असतील तर साबणाच्या रसायनांमुळेही येथील जैवविविधतेला धोका पोहोचेल. माशांच्या प्रजननाच्या काळात मासेमारी होत असेल तर ती चिंतेचीच बाब आहे.
– विद्याधर वालावलकर, पर्यावरण दक्षता मंच