एकीकडे डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आता या आजारावरील उपचार पद्धतीतील काही त्रुटीही समोर येऊ लागल्या आहेत. डेंग्यू रुग्णाच्या रक्तातील प्लेटलेट्स हा महत्त्वाचा घटक कमी होत असल्याने त्याची प्रतिकारक्षमता आणि शक्ती कमी होते. त्यामुळे अनेकदा डेंग्यूचा रुग्ण तपासणीसाठी येताच सर्वप्रथम त्याला ‘प्लेटलेट्स’ पुरवल्या जातात. परंतु प्लेटलेट्सचा अतिवापर रुग्णासाठी प्रसंगी धोकादायकही ठरू शकतो. यावर प्रकाश पाडणारे हे ‘लोकसत्ता लोकज्ञान’.
डेंग्यू रुग्णाच्या रक्तातील प्लेटलेट्स कमी होतात. प्लेटलेट्सचा अभाव भरून काढण्यासाठी गेल्या काही दिवसांमध्ये रक्तपेढय़ांकडे ओघ वाढला आहे. डेंग्यू ‘एडिस इजिप्ती’ हा डास चावल्यामुळे होतो. डास चावल्यानंतर काही दिवसांत रुग्णाला ताप येतो आणि तापामुळे रुग्णाच्या शरीरातील प्लेटलेट्स झपाटय़ाने कमी होतात. या तापामध्ये रुग्णाची रोगप्रतिकारकशक्ती कमी होते आणि शरीरांतर्गत किंवा बाह्य़ रक्तस्राव होतो. अशा रुग्णांच्या रक्तातील प्लेटलेट्स आजाराच्या तीव्रतेनुसार खाली घसरतात. रुग्णाचे प्लेटलेट्स ५० हजारांवर आल्यानंतर रुग्ण डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असतो आणि प्लेटलेट्स झपाटय़ाने कमी होत असल्यास त्या चढवण्याचा निर्णय घेतला जातो. तर भारतातील वैद्यकीय मार्गदर्शक सूचनेप्रमाणे डेंग्यू आजारात रुग्णांचे प्लेटलेट्स २० हजापर्यंत खाली आल्यासच रुग्णांना बाहेरून प्लेटलेट्स देता येऊ शकतात. मात्र अनेकदा आवश्यकता नसतानाही रुग्णांना प्लेटलेट्स दिले जाते. त्यामुळे, रुग्णाला फुप्फुसाचे त्रास सुरू होऊ शकतात.
तीन वर्षांपूर्वी सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यात प्लेटलेट्सचा तुटवडा निर्माण झाला होता. डेंग्यूचे रुग्ण वाढले होते आणि रुग्णांना आवश्यकतेपेक्षा अधिक प्लेटलेट्स दिल्यामुळे प्लेटलेट्सचा तुटवडा निर्माण झाला होता. यावर्षीही हाच प्रकार होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्लेटलेट्स दिल्या जाणाऱ्या प्रत्येक रुग्णाची नोंदणी, किती प्लेटलेट्स दिल्या, किती प्लेटलेट्सची गरज अशा सर्व पातळीवर नोंद घेण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. अधिक प्लेटलेट्समुळे मृत्यू ओढवला तर कारवाई केली जाईल, असे पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितले.
कमतरताही हानिकारक
शरीरातील प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे तोंडावाटे, नाकावाटे, थुंकीतून, शौचास रक्तस्राव होतो किंवा शरीरावर लालसर चट्टे येतात. बाह्य़ किंवा अंतर्गत रक्तस्राव होतो, तर रक्तातील प्लेटलेट्स कमी असल्यास जखम झाल्यास रक्तस्राव आटोक्यात येत नाही.
नेमकी औषधे नाहीत
प्लेटलेट्स वाढविण्यासाठी नेमकी औषधे उपलब्ध नसून पोषक आहार, द्रव्य पदार्थाचे सेवन, आराम यामुळे काही दिवसांत प्लेटलेट्सची संख्या वाढते.
अधिक प्लेटलेट्स शरीरास धोकादायक
रक्तात प्लेटलेट्सचे प्रमाण वाढले तर त्याचा शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो. यात रक्ताची गुठळी तयार होण्याची शक्यता असते. यामुळे रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होऊन हृदयरोग, फुप्फुसाचे आजार किंवा शरीराचा भाग निकामी होण्याची शक्यता असते. यात जीवितहानी होण्याचीही शक्यता असते.
प्लेटलेट्स म्हणजे काय?
प्लेटलेट्स हा मानवी रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे. वैद्यकीय भाषेत याला ‘थ्रोम्बोसाइट्स’ म्हणतात. रक्त पातळ होऊ न देण्याचे आणि रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्रावाला अटकाव आणणे हे प्लेट्लेट्सचे प्रमुख काम आहे. हिमोग्लोबिन, प्लाझ्माप्रमाणे प्लेटलेट्स हा रक्तातील महत्त्वाचा घटक आहे. रक्तात प्रामुख्याने तांबडय़ा पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्स हे घटक असतात. हे प्लेटलेट्स हाडांतील मज्जेत असणाऱ्या ‘मेगा कॅरोसाइट्स’ या पेशींपासून तयार होतात. ‘प्लेटलेट्स’ या तीन ते चार दिवसांत नव्याने तयार होत असतात. जखम झाल्यावर शरीरातून अधिक रक्त वाहून जाणे धोकादायक असते. अशा वेळी ‘प्लेटलेट्स’ रक्तप्रवाह खंडित करण्याचे किंवा रक्ताच्या गुठळ्या करण्याचे काम करते. सर्वसाधारणपणे निरोगी माणसाच्या शरीरात दीड ते साडेचार लाखांपर्यंत ‘प्लेटलेट्स’ असतात.
प्लेटलेट्स देण्याच्या पद्धती
रक्तपेढय़ांमध्ये जमा होणाऱ्या रक्तातील प्लेटलेट्स वैद्यकीय प्रक्रियेने वेगळ्या करून रुग्णालयांना दिल्या जातात. यासाठी सर्वसाधारणपणे ४५० ते ९५० इतका खर्च येतो. ‘सिंगल डोनर’ पद्धतीत दात्याच्या रक्तातील प्लेटलेट्स काढून घेतले जाते आणि रक्त पुन्हा दात्याच्या शरीरात सोडले जाते. ही प्रक्रिया खर्चीक असून यासाठी ६,५०० ते १२,००० रुपयांपर्यंत खर्च होतो.