आता ‘लतायुग’ सुरू – पंडित हृदयनाथ मंगेशकर
मुंबई : ‘‘लतादीदी गाण्यांच्या रूपात आपल्यासोबत आहेत. ती गेलेली नाही. गायनाचे पर्व संपले तरी हा युगान्त नाही, तर ‘लतायुग’ सुरू झाले आहे. हे लतायुग अनेक तरुणांना प्रेरणा देणार आहे’’, अशी भावना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केली. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यंदापासून लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार असून पहिला पुरस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा उषा मंगेशकर यांनी केली.
‘‘नरेंद्र मोदी हे दीदीला बहिण मानायचे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या उद्घाटनाला नरेंद्र मोदी आले होते, तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे अशी इच्छा लतादिदीने त्यावेळी व्यक्त केली होती. तिच्या या वक्तव्यावर अनेकांनी टीका केली होती. लतादिदी ही सरस्वती होती आणि तिने व्यक्त केलेली इच्छा खरी ठरली. नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार द्यावा हे आम्ही आमचे कर्तव्यच समजतो’’, अशी भावना हृदयनाथ मंगेशकर यांनी यावेळी व्यक्त केली. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या निधनानंतर लतादिदींनी आपले पहिले गाणे रेकॉर्ड केले. या घटनेला ८० वर्षे पूर्ण होत आहेत.
येत्या २४ एप्रिलला मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची ८० वी पुण्यतिथी साजरी होणार असून त्यानिमित्ताने सोमवारी मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावेळी पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, भारती मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर आणि हृदयेश आर्ट्सचे अविनाश प्रभावळकर उपस्थित होते.
२४ एप्रिल रोजी सकाळी कलिना येथील मुंबई विद्यापीठाच्या जागेत ‘लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत विद्यापीठा’चा नामफलक लावण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मंगेशकर कुटुंबीयांनी दिली.
राहुल देशपांडे, आशा पारेख, जॅकी श्रॉफही मानकरी
सर्वोत्कृष्ट जनसेवेसाठीचा पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात येणार आहे. उत्कृष्ट संगीत कारकीर्दीसाठी गायक राहुल देशपांडे, चित्रपटातील सर्वोत्कृष्ट कारकीर्दीसाठी अभिनेत्री आशा पारेख आणि जॅकी श्रॉफ, नूतन मुंबई टिफिन चॅरिटेबल ट्रस्ट यांना सामाजिक कार्यासाठी आनंदमयी पुरस्कार तर सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार ‘संध्याछाया’ या चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित नाटकाला देण्यात येणार आहे. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित या पुरस्कारांचे वितरण २४ एप्रिल रोजी षण्मुखानंद सभागृहात संध्याकाळी ६ वाजता होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणाऱ्या उषा मंगेशकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. स्वरलतांजली या खास कार्यक्रमाचे आयोजनही यावेळी करण्यात आले आहे.