रिझव्र्ह बँकेविरोधात रिट याचिका दाखल करणार, २ ऑक्टोबरला आंदोलन
पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी बँक) खातेदार-ठेवीदारांनी रविवारी भांडुप येथील बैठकीत संचालक मंडळासह रिझव्र्ह बँकेविरोधात रिट याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला.
बँकेवरील आर्थिक र्निबध उठवून ठेवीदारांच्या ठेवींना पूर्ण संरक्षण मिळावे या मागणीसाठी २ ऑक्टोबरला आझाद मैदानात आंदोलन करण्यात येणार आहे.
रिझव्र्ह बँकेने लादलेल्या आर्थिक र्निबधांच्या पाश्र्वभूमीवर रविवारी सकाळी भांडुपच्या ड्रीम्स मॉल (बँकेच्या मुख्यालयाजवळ) येथे पीएमसीबीच्या ठेवीदार-खातेधारकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे निमंत्रक विश्वास उटगी, विवेक मॉन्टेरे आणि कॉ. सुगंधा फ्रान्सिस उपस्थित होत्या. या बैठकीत ठेवीदार-खातेदारांवर ओढवलेल्या परिस्थितीला बँकेच्या संचालक मंडळासह रिझव्र्ह बँकही तितकीच जबाबदार असल्याचा सूर एकमुखी उमटला. त्यामुळे रिझव्र्ह बँकेविरोधातही आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
एचडीआयएल कंपनीला बँकेने २५०० कोटींचे कर्ज दिले होते. ते फेडण्याची कुवत नसताना या कंपनीला बँकेने इतकी मोठी रक्कम कर्जाऊ का दिली? कर्ज बुडवणाऱ्या या कंपनीवर बँकेने काय कारवाई केली? गेल्या आर्थिक वर्षांच्या सरतेशेवटी बँकेचा ताळेबंद तपासताना रिझव्र्ह बँकेने एचडीआयएलला दिलेल्या कर्जाची परतफेड होऊ शकत नाही, त्यामुळे बँकेवर आर्थिक र्निबध लागू शकतात याचा अंदाज घेऊन त्याचवेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना का केली नाही? असे सवाल या बैठकीत उपस्थित करण्यात आले.
रिट याचिकेत संचालक मंडळासह रिझव्र्ह बँकेला प्रतिवादी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. रिट याचिकेच्या माध्यमातून बँक संचालक मंडळाचा गैरकारभार, रिझव्र्ह बँकेचा निष्काळजीपणा यावर चर्चा होईल. ठेवींना संपूर्ण संरक्षण, आर्थिक र्निबध उठवून बँकेचे पुनरुज्जीवन अशा प्रमुख मागण्या याचिकेत केल्या जातील, असे उटगी यांनी सांगितले.
काँग्रेसचे आज आंदोलन : रिझव्र्ह बँकेने पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-ऑप. बँकेवर घातलेल्या र्निबधामुळे बँकेचे १६ लाख खातेदार अडचणीत आले आहेत. त्यामुळे रिझव्र्ह बँकेच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेस आज, सोमवारी शीव पूर्व परिसरात ‘भीक मांगो’ आंदोलन करणार आहे. र्निबध लादणाऱ्या रिझव्र्ह बँकेचा निषेध करण्यासाठी मुंबई काँग्रेसने सोमवारी शीव (पूर्व) येथील शीव कोळीवाडा परिसरातील तमिळ संघम हॉलजवळील बँकेच्या शाखेसमोर दुपारी १२.३० वाजता ‘भीक मांगो’ आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे, असे मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी सांगितले.