गणेशोत्सवासाठी मुंबई पोलिसांनी शहरात पाचस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवली असून तब्बल ४५ हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. वाहतूक व्यवस्थेतही मोठय़ा प्रमाणावर बदल करण्यात आले आहेत.
यंदा शहरात ६,७१२ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून १ लाख २१ हजार २२६ घरांमध्ये गणपती बसणार आहेत. गणेशोत्सव काळात चोख बंदोबस्त ठेवण्यासाठी पोलिसांनी पाचस्तरीय सुरक्षा व्यवस्था तयार केल्याची माहिती सहपोलीस आयुक्त धनंजय कमलाकर यांनी दिली. गुन्हेगारी, गर्दी, दहशतवाद, वाहतूक आणि व्यवस्थापन आदी मुद्दय़ांवर ही पाचस्तरीय सुरक्षा व्यवस्था आखण्यात आली आहे. ४५ हजार पोलीस बंदोबस्तासाठी मुंबईच्या रस्त्यावर उतरणार असून त्याशिवाय राज्य राखीव पोलीस दल, निमलष्करी दल, शीघ्र कृती दल बंदोबस्तासाठी मागविण्यात आले आहेत. छेडछाड विरोधीपथक, मोबाइल चोरी आणि सोनसाखळी चोरीविरोधी पथकही तैनात असणार आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून १५ हजार गुन्हेगारांना शहरातून हद्दपार करण्यात आले असून दोन हजार जणांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. २, ४ , ७ आणि ८ सप्टेंबर या चारच दिवशी मध्यरात्रीपर्यंत डीजे आणि वाद्य वाजविण्यास परवानगी असून अन्य दिवशी नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई केली जाणार असल्याचे कमलाकर यांनी सांगितले.
वाहतूक व्यवस्थेतही अनेक बदल करण्यात आले असून अनेक मार्ग मिरवणुकीच्या काळात बंद करून काही मार्ग एकदिशा करण्यात आल्याचे सहपोलीस आयुक्त (वाहतूक) बी. के. उपाध्याय यांनी सांगितले. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर यंदा प्रथमच शून्य पार्किंग राबविले जाणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Aug 2014 रोजी प्रकाशित
गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी पोलीस सज्ज
गणेशोत्सवासाठी मुंबई पोलिसांनी शहरात पाचस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवली असून तब्बल ४५ हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.
First published on: 27-08-2014 at 02:30 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police administration ready for ganesh festival