दाराला कुलूप हे सुरक्षेसाठी लावले जाते. एकापेक्षा जास्त कुलूप लावले तर सुरक्षा भक्कम असा समज असतो. दोन ठकसेन मात्र नेमके याच समजामुळे अडकले. पोलिसांपासून बचाव करण्यासाठी त्यांनी घराला पाच कुलूप लावले आणि लपून बसले होते. पण याच कुलूपांमुळे पोलिसांना संशय आला आणि कुलुपांनी ठकसेनांचा घात केला..
“पुढे दरोडा पडलाय. आम्ही पोलीस आहोत. तुमचे दागिने काढून द्या..” असे सांगून वरिष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोन ठकसेनांनी मुंबईत धुमाकूळ घातला होता. पहाटे ४ ते ७ या वेळेत ते वृद्ध नागरिकांना आपले सावज बनवत होते. ऑक्टोबर २०१३ मध्ये मात्र हे दोन ठकसेन एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसले होते. भोईवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल गायकवाड यांनी त्या फुटेजवरून आरोपींची ओळख पटवली. अमजद अली अकबर अली बेग (२६) आणि गाझी रफीक जाफरी (३०) अशी त्यांची नावे होते. ते इराणी होते. त्यावरून शोध सुरू केला.
दरम्यान, भिवंडीच्या शांतीनगर परिसरातील एका इमारतीत हे दोन्ही आरोपी राहत असल्याची माहिती मिळताच गायकवाड व सुर्वे यांचे पथक गेले. पण इमारतीत ते सापडले नाहीत. परत जाताना पोलिसांचे लक्ष एका घराकडे गेले. त्या दाराला लोखंडी दार होते. त्याला एक नव्हे तर चक्क पाच कुलूप लावण्यात आले होते. तसेच वर सीसीटीव्ही कॅमेराही होता. दाराला सहसा एकच किंवा फारतर दोन कुलूप असतात. पण या साधारण इमारतीत एवढी कडेकोट सुरक्षा कसली याचे त्यांना कुतूहल वाटले. नंतर दार तोडून प्रवेश केला असता हे दोन ठकसेन बाथरूममध्ये लपून बसलेले आढळले. पोलीस आल्याची माहिती मिळतात एका नातेवाईकाने त्यांना घरात लपवून दाराला पाच कुलूप लावले होते. पण त्या कुलूपांमुळेच ठकसेनांना गजाआड झाले, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तोंडवळकर यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 4th Aug 2014 रोजी प्रकाशित
दारांवरील पाच कुलुपांमुळे सराईत ठकसेन जेरबंद
दाराला कुलूप हे सुरक्षेसाठी लावले जाते. एकापेक्षा जास्त कुलूप लावले तर सुरक्षा भक्कम असा समज असतो. दोन ठकसेन मात्र नेमके याच समजामुळे अडकले.
First published on: 04-08-2014 at 03:09 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police arrested fraud gang from bhiwandi