कुख्यात गुंड संदीप गडोली याच्या बनावट चकमकीचे नेतृत्व करणारा हरयाणा पोलीस दलातील उपनिरीक्षक प्रद्युम्न यादव याला मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने मंगळवारी रात्री गुडगाव येथून अटक केली. यादव याच्यासह हरयाणा पोलीस दलातील चार पोलिसांवर गडोली याची अंधेरीतील एका हॉटेलमध्ये हत्या केल्याचा आरोप आहे. उपनिरीक्षक यादव याला ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हरयाणातील कुख्यात गुंड संदीप गडोली अंधेरी एम.आय.डी.सी. येथील एअरपोर्ट मेट्रो हॉटेल येथे लपल्याची माहिती गुडगाव पोलिसांना मिळाली. ७ फेब्रुवारी रोजी गुडगाव पोलीस दलातील उपनिरीक्षक प्रद्युम्न यादव चार सहकाऱ्यांसह हॉटेलमध्ये दाखल झाले. हॉटेलमध्ये झालेल्या चकमकीत गडोली जबर जखमी झाला, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. मात्र, गडोलीच्या कुटुंबीयांनी ही चकमक बनावट असून पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने ही हत्या केल्याचा आरोप केला होता.

मुंबई उच्च न्यायालयात कुटुंबीयांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर न्यायालयाने गुडगांव पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यास सांगितले होते. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात ५ पोलीस अधिकारी-कर्मचारी यांच्यासह गडोली हिची मैत्रीण, तिची आई अशा नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्य़ाचा तपास मुंबई पोलिसांचे विशेष तपास पथक (एसआयटी) करत आहे.

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police arrested in fake encounter case
First published on: 07-07-2016 at 00:57 IST