चोराला पकडताना प्राण गमवावा लागलेले पोलीस नाईक अजय गावंड यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी पोलीस दल सरसावले आहे. गावंड यांची मरणोत्तर शौर्यपदक पुरस्कारासाठी शिफारस करण्यात येणार आहे. रविवारी पहाटे डोंगरी येथे एका चोराला पकडण्यासाठी गेलेल्या गावंड यांचा चोराने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.
नवी मुंबईत राहणारे अजय गावंड डोंगरी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. रविवारी पहाटे डोंगरीच्या वाडीबंदर येथील एका इमारतीत संतोष साळवी नावाचा चोर शिरला होता. तो इमारतीच्या गच्चीवर लपला होता. त्याला पकडण्यासाठी पोलीस नाईक अजय गावंड (४२) हे जीव धोक्यात घालून मागील बाजूने दुसऱ्या मजल्याच्या खिडकीवरून गच्चीत गेले होते. परंतु दबा धरून बसलेल्या साळवी याने गावंड यांच्या डोक्यात लाकडी दांडुक्याने प्रहार केला. त्यात ते जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.
गावंड हे नोकरीत आहेत, असे गृहीत धरून त्यांना निवृत्तीच्या वयापर्यंत वेतन देण्याचा निर्णय रविवारीच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला होता. आता गावंड यांच्या धैर्याचा गौरव करण्यासाठी त्यांच्या नावाची शिफारस पोलीस शौर्यपदकासाठी करण्यात येणार असल्याचे परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.
गावंड यांच्या पत्नीला त्वरित अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात येणार आहे. तर त्यांच्या मुलाच्या पदवीपर्यंतच्या सर्व शिक्षणाचा खर्च केला जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
पोलीस दलाने एकत्र येऊन गावंड यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. मुंबई पोलीस दलातील पोलीस शिपायापासून आयुक्तांपर्यंत सर्व कर्मचारी आणि अधिकारी आपापल्या कुवतीनुसार आर्थिक मदत देणार आहेत.