मुंबई : नव्वदच्या दशकात अभिनेता अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांची मुख्य भूमिका असलेला ‘अजूबा’ चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सुमारे ३५ वर्षांनंतर हा सिनेमा यूट्युबवर बेकायदेशीरित्या प्रदर्शित करण्यात आल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झी स्टुडियोजबरोबर बनावट करार करून मेसर्स जेसीन या कंपनीने हा चित्रपट युट्यूबवर प्रदर्शित केल्याचा आरोप आहे.
सुपरस्टार अमिताभ बच्चन, ऋषि कपूर, डिंपल कपाडिया यांची प्रमुख भूमिका असलेला अजूबा हा चित्रपट १९९१ मध्ये प्रदर्शित झाला होता. ३५ वर्षानंतर पुन्हा हा चित्रपट चर्चेत आला आहे. यूट्युबवर हा चित्रपट बेकायदेशीरपणे प्रसारित करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाचे मूळ हक्क ‘इन एन्टरटेनमेन्ट’ आणि ‘फिल्मवालाज’ या कंपन्यांकडे आहे. त्यांनी याबाबत अंधेरीच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
रवी आहुजा (५१) हे इन एन्टरटेन्मेट या कंपनीचे संचालक आहे. चित्रपटाचे मालकी हक्क विकत घेऊन चित्रपट प्रसारित करण्याचे काम कंपनी करते. ६ ऑक्टोबर १९९९ रोजी ‘आशिया मॅनेजमेंट ॲण्ड कन्सल्टन्सी’ तसेच ‘फिल्मवालाज’ यांच्यात ‘अजुबा’ चित्रपटाबाबत करार झाला होता. त्यानुसार दोन्ही कंपन्यांकडे या चित्रपटाच्या प्रदर्शनाचे ५० टक्के मालकी हक्क होते. त्यानंतर नोव्हेंबर २००६ मध्ये आशिया मॅनेजमेंट ॲण्ड कन्सल्टंसी कंपनीने आहुजा यांच्या इन एन्टरटेनमेन्ट कंपनीबरोबर करार करून त्यांना चित्रपटाचा ५० टक्के मालकी हक्क दिला. त्यामुळे इन एन्टरटेनमेन्टकडे या चित्रपटाच्या प्रदर्शनाचे हक्क होते.
सिनेमाचे कुठे बेकायदेशीर प्रसारण होऊ नये, त्याची पायरसी होऊ नये याची कंपनी नियमित पडताळणी करीत असते. मात्र मागील वर्षी हा चित्रपट यूट्युबवर प्रसारित झाल्याचे कंपनीच्या लक्षात आले. फिल्मवालाज या कंपनीने याबाबत तात्काळ युट्यूब कंपनीला ई – मेल पाठवून याबाबत विचारणा केली. तेव्हा मेसर्स जेसीन ॲण्ड कंपनीने हा चित्रपट प्रदर्शित केल्याचे समजले. मेसर्स जेसीन ॲण्ड कंपनीने झी स्टुडियोजकडून चित्रपटाचे हक्क विकत घेतल्याचा दावा केला होता.
परंतु झी कंपनीने असा कुठलाही करार केला नसल्याचे स्पष्ट केले. यासंदर्भात केलेल्या कराराची कागदपत्रेही बोगस होती. त्यामुळे मेसर्स जेसीन कंपनीला हा चित्रपट हटविण्यास सांगण्यात आले. परंतु त्यांनी चित्रपट हटवला नाही. त्यामुळे आमचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा रवी आहुजा यांच्या इन एन्टरटेनमेन्ट कंपनीने तक्रारीत केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मेसर्स जेसीन ॲण्ड कंपनीच्या विरोधात प्रतिलिपी अधिकार अधिनियम १९५७ (सुधारीत अधिनियम १९८४ आणि १९९४) च्या कलम ६३ आणि ६९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.