लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई: दक्षिण मुंबईतील जे.जे. उड्डाणपुलावर रुग्णवाहिकेने दिलेल्या धडकेत वाहतूक पोलीस जखमी झाला. याप्रकरणी सर जे.जे. मार्ग पोलिसांनी आरोपी चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला बुधवारी अटक केली. आरोपीची जामिनावर सुटका करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
आणखी वाचा- सेट टॉप बॉक्स रिचार्जमध्ये अडचण, कस्टमर केअरला कॉल केला आणि मुंबईतल्या महिलेने गमावले ८१,०००
मयुर कुलकर्णी असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव असून त्याच्याविरोधात भरधाव वेगाने गाडी चालवून इतरांचे प्राण धोक्यात घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला १० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. जे.जे. उड्डाणपुलावरील दक्षिण वाहिनीवर हा अपघात घडला. आरोपी भरधाव वेगात रुग्णवाहिका चालवत होता. त्याने पाठीमागून येणाऱ्या टॅक्सीलाही धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात पोलीस शिपाई एकनाथ कोतवालही जखमी झाले. ते साकिनाका विभागात कार्यरत आहेत. त्याचा हात, छाती आणि पाठीला दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. कोतवाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.