किडनी प्रत्यारोपण रॅकेटप्रकरणी पोलिसांचा निर्धार : डॉक्टरांचा ‘अर्थपूर्ण’ सहभाग
पवई येथील हिरानंदानी रुग्णालयातील किडनी प्रत्यारोपण घोटाळ्यात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासह पाच डॉक्टरांना जामीन मिळाल्याच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी या घोटाळ्याची संपूर्ण पाळेमुळे खणून काढण्याचा निर्धार केला आहे. या घोटाळ्यात डॉक्टरांचा अर्थपूर्ण सहभाग असल्याचे पोलीस सहआयुक्त देवेन भारती यांनी स्पष्ट केले असून ज्या पद्धतीने डॉक्टरांच्या संघटनांनी पोलिसांच्या कारवाईवरून संशयाचे वातावरण निर्माण केल्याबाबतही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
यापूर्वीही पंचतारांकित रुग्णालयांमध्ये डॉक्टरांचा किडनी प्रत्यारोपण रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे आढळून आले आहे. हिरानंदानी रुग्णालय प्रकरणात पोलिसांनी वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडून प्रत्यारोपणातील डॉक्टरांची जबाबदारी व कर्तव्ये यांची माहिती घेतली होती.
यामध्ये रुग्णालय प्रशासन व संबंधित डॉक्टरांनी कागदपत्रे तपासणे तसेच रुग्णाच्या नातेवाईकांची अधिकाधिक माहिती घेणे अपेक्षित आहे. अवयव प्रत्यारोपण कायदा १९९४ अंतर्गत ज्या रुग्णालयामध्ये प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होतात, त्यांच्यावर कागदपत्रे तपासणे कायद्याने बंधनकारक आहे.
दबावतंत्र आक्षेपार्ह
२००५ मध्ये रक्ताचे नातेवाईक आणि पती वा पत्नीकडून अवयवदान होणार असल्यास परवानगी देण्याचे अधिकार संबंधित रुग्णालयांच्या समितीला देण्यात आले होते. दहा वर्षे ही व्यवस्था सुरू असताना हिरानंदानीमधील डॉक्टरांना अटक केल्यानंतर नेफ्रॉलॉजी व युरोलॉजी डॉक्टरांच्या संघटनेने शस्त्रक्रिया बंद करण्याची धमकी देत जे दबावतंत्र अवलंबिले ते आक्षेपार्ह असल्याचेही भारती यांनी सांगितले.
या प्रकरणात शासनाच्या समितीकडून डॉक्टरांच्या सहभागाबाबत अहवाल मागविला होता. हा अहवाल मिळाल्यानंतरच डॉक्टरांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या रॅकेटमध्ये डॉक्टरांनीही आर्थिक व्यवहार केल्याचे उघडकीस आल्यानेच त्यांना अटक करण्यात आली. अर्थपूर्ण व्यवहाराशी डॉक्टरांचा संबंध नाही, असे चुकीचे पसरविले जात आहे. या संपूर्ण तपासावर आपली देखरेख असून या घोटाळ्याची पाळेमुळे खणून काढू
– देवेन भारती, पोलीस सहआयुक्त
मुख्यमंत्री स्वत: या प्रकरणी माहिती घेत होते. अवयवदान प्रक्रियेत घोटाळा करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडू नका, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. या डॉक्टरांना जामीन मिळाल्यामुळे भविष्यात रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्यांना लवकर जामीन मिळू नये आणि अधिकाधिक कठोर शिक्षा व्हावी यासाठी केंद्र शासनाकडे तरतुदी करून शिफारस पाठविण्यात येणार आहे.
– गिरीश महाजन , वैद्यकीय शिक्षणमंत्री
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासह पाच डॉक्टरांना जामीन
मुंबई : पवई येथील हिरानंदानी रुग्णालयातील मूत्रपिंड विक्री गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुजीत चॅटर्जी, वैद्यकीय संचालक डॉ. अनुराग नाईक यांच्यासह आणखी तीन डॉक्टरांना अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांनी गुरुवारी सशर्त जामीन मंजूर केला.
मुकेश शेटय़े, मुकेश शह आणि प्रकाश शेटय़े या तिघांचाही जामीन मिळालेल्यांमध्ये समावेश आहे. या पाचजणांना न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडून न जाण्यास मज्जाव करण्यात आला असून २६ सप्टेंबपर्यंत त्यांनी पवई पोलिसांसमोर हजेरी लावण्यास बजावले आहे. १३ ऑगस्ट रोजी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर पाचही जणांनी जामिनासाठी अर्ज केला होता. डॉक्टर आणि रुग्णालयाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात केवळ प्रक्रियेतील त्रुटी आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शिवाय तो भारतीय दंडविधान नव्हे, तर अवयव प्रत्यारोपण कायद्यानुसार दाखल करण्यात आलेला आहे. तसेच मूत्रपिंड दाता आणि दाता आणि प्रकरणातील अन्य आरोपींना जामीन मिळालेला आहे. त्याचमुळे या पाचजणांनाही जामीन देण्याची विनंती त्यांच्या वकिलांकडून करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद मान्य करत पाचही डॉक्टरना सशर्त जामीन मंजूर केला.

