मुंबई – शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना विधिमंडळाच्या हक्कभंग समितीने नोटीस पाठवली. मात्र, ती देण्यासाठी अंधारे यांच्या घरी गुन्हे अन्वेषण शाखेचे ८ पोलीस गेले. अंधारे यांना घाबरवण्यासाठी, त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी पोलिसांचा वापर करण्यात आला, असा आरोप अनिल परब यांनी विधान परिषदेत केला.

विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर अनिल परब यांनी माहितीच्या मुद्द्याद्वारे या घटनेकडे लक्ष वेधले. अंधारे, कुणाल कामरा यांच्याविरोधातील हक्कभंग प्रस्ताव सभागृहात आला. तो मंजूर होऊन हक्कभंग समिती प्रमुखांकडे गेला. हक्कभंग मान्य होऊन नोटीस काढण्यात आली. मात्र पोस्टाने किंवा विधिमंडळाच्या कर्मचाऱ्यांमार्फत नोटीस न पाठवता गुन्हे अन्वेषण शाखेच्या ८ पोलिसांना पाठवण्यात आले. पोलिसांना काही काम उरले नाही का? कित्येक आरोपी मोकाट सुटले आहेत त्यांना पकडायचे सोडून पोलीस नोटीस घेऊन गेले. हे काय चालले आहे, असा संताप परब यांनी व्यक्त केला. दरम्यान, अंधारे यांच्या पत्त्यावर कोणी राहत नसल्याचे उत्तर आले. समितीच्या दुसऱ्या प्रक्रियेनुसार जिह्यातील पोलीस अधीक्षक किंवा शहराचे पोलीस आयुक्तांमार्फत नोटीस पोहोचवली जाते. त्यामुळे पक्रियेनुसार नोटीस पाठवली, अशी माहिती हक्कभंग समितीचे प्रमुख प्रसाद लाड यांनी दिली.