चोरीच्या प्रकरणात ‘मुद्देमाल’ म्हणून ताब्यात घेतलेली सोन्याची साखळी गहाळ होणे बुलढाणा पोलिसांना  महागात पडणार आहे. या सोन्याच्या साखळीची भरपाई तातडीने करा आणि नंतर या खर्चाची वसुली सोनसाखळी गहाळ होण्यास जबाबदार असलेल्या पोलिसांकडून करा, असा आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
न्यायमूर्ती ए. बी. चौधरी आणि न्यायमूर्ती पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. विजय पंडागळे यांच्या घरी २००५ मध्ये चोरी झाली होती. त्यात १७.९५ ग्रॅमच्या सोनसाखळीचा समावेश होता. या चोरीच्या गुन्हय़ात पोलिसांनी भगवान नावाच्या इसमाला मुद्देमालासह अटक केली. त्याच्याकडून हस्तगत केलेला मुद्देमाल पंडागळेंना परत करताना सोनसाखळी गहाळ झाल्याची बाब पुढे आली. याबाबत पंडागळेंनीकनिष्ठ न्यायालयात दाद मागितली असता बाजारभावानुसार सोनसाखळीची भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले होते.
भरपाईची रक्कम न मिळाल्याने पंडागळे यांनी उच्च न्यायालय प्रशासनाशी याबाबत पत्रव्यवहार केला होता. त्याची दखल घेत न्यायालयाने बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यावर स्पष्टीकरण मागितले होते. त्याला उत्तर देताना पोलीस अधीक्षकांनी या प्रकारास जबाबदार पोलिसांच्या वेतनातून भरपाईची रक्कम वसूल करण्याची कारवाई करण्यात आल्याचे कळविले. तसेच ही रक्कम वसूल करण्यात आल्यावर पंडागळे यांना ती देण्यात येईल, असा दावाही केला. परंतु संबंधित पोलिसांकडून सोनसाखळीची रक्कम वसूल केल्यावर ती पंडागळे यांना देण्यात येईल हे जिल्हाधिकाऱ्यांचे म्हणणे मान्य करता येऊ शकत नाही, असे नमूद करीत न्यायालयाने ते फेटाळून लावले.