अनिश पाटील

मुंबई : सुमारे दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) २०२२मध्ये महापालिकेच्या ‘डी’ वॉर्डातील सहाय्यक अभियंता व दुय्यम अभियंत्याला २०२२मध्ये अटक केली होती. यातील दुय्यम अभियंत्याच्या बदलीसाठी एका माजी महापौराने २०२० मध्ये शिफारस पत्र दिल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेतील बदल्यांमध्ये होत असलेल्या राजकीय हस्तक्षेपातील भ्रष्टाचार अधोरेखित झाला आहे.

गेल्या तीन वर्षांत मुंबई महापालिकेच्या विशिष्ट अधिकाऱ्याची खात्यात नियुक्ती व्हावी किंवा बदली व्हावी म्हणून नगरसेवकापासून ते केंद्रीय मंत्र्यांपर्यंत विविध राजकीय प्रभावशाली व्यक्तींच्या तीनशेहून अधिक शिफारसी महापालिकेकडे आल्याची बाब माहिती अधिकारांतर्गत उघड झाली आहे. काही अधिकाऱ्यांवर आरोप असतानाही त्यांच्या शिफारसी करण्यात आल्या आहेत तर काहींची खात्यात बदली झाल्यानंतर ते लाच घेताना सापडले आहेत. माजी महापौरांनी शिफारस केलेल्या अधिकाऱ्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २१ जून २०२२ मध्ये मोटरगाडीचे सुटे भाग विकणाऱ्या एका दुकानदाराने तक्रार केली. दुकानाच्या मागील जागेत तक्रारदाराला पावसाळी निवारा (शेड) बांधायचा होता. त्यासाठी डी वॉर्डातील या दुय्यम अभियंत्याने दोन लाख रुपयांची मागणी केली.

या तक्रारीची शाहनिशा करण्यासाठी १ जुलै, २०२२ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा एक पंच व तक्रारदार महापालिकेच्या डी वॉर्डाच्या इमारत व कारखाना विभागात गेले होते. त्यावेळी तेथील साहाय्यक अभियंता व दुय्यम अभियंता यांनी पावसाळी शेड बांधण्याची परवानगी देण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली व तडजोडी अंती एक लाख ९० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर ४ जुलै २०२२ रोजी तक्रारदाराने मागणी केलेले एक लाख ९० हजार रुपये घेऊन डी वार्डाच्या इमारत व कारखाने विभागातील आरोपी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात गेले. त्यावेळी एक लाख ९० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत विभागाने दुय्यम अभियंत्याला पकडले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लाखो रुपयांचा अपहार उघड

दुय्यम अभियंत्याच्या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शोधमोहीम राबविली होती. त्यावेळी त्याच्या कार्यालयामधील टेबलाच्या खणात तब्बल १७ लाख ६४ हजार रुपयांची रोख रक्कम सापडली होती. याच लाचखोर दुय्यम अभियंत्याच्या बदलीसाठी माजी महापौरांनी शिफारस केली होती.