लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच ठाणे-कळव्यातील राजकीय वैमनस्य उफाळून आले आहे. निवडणुकीत असहकार केल्याचा राग मनात धरून  ठाण्यातील वाघोबानगर परिसरातील सचिन म्हात्रे या शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने रविवारी रात्री क्षुल्लक कारणावरून या भागातील तबेला मालकावर गोळीबार केला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कळवा, वाघोबानगर परिसरात महापालिकेची पोटनिवडणुक घेण्यात आली होती. या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर लढणाऱ्या म्हात्रे यांचा अवघ्या ५२ मतांनी पराभव झाला होता. या भागातील ठराविक परप्रांतिय वस्त्यांमधून असहकार झाल्यामुळे शिवसेनेच्या पदरी पराभव पडल्याची तेव्हा चर्चा होती. त्यामुळेच हा गोळीबार करण्यात आला.
याप्रकरणी कळवा पोलिसांनी सचिन म्हात्रे, त्याचे वडील जयराम म्हात्रे (५२), राजकुमार डे (३२) यांच्यासह अन्य पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी जयराम म्हात्रे तसेच राजकुमार डे यांना पोलीसांनी अटक केली असून मुख्य आरोपी सचिन म्हात्रे फरार असल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली. सुदाम यादव (६४) असे हल्ला झालेल्याचे नाव आहे. सचिन हा यापूर्वी बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर निवडून आला होता. मात्र, महापालिकेच्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत वाघोबानगर परिसरातून गणेश साळवी हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजयी झाले. त्यानंतर स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर साळवी यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला. साळवी यांच्या राजीनाम्यामुळे वाघोबानगर येथे घेण्यात आलेल्या निवडणुकीत सचिन म्हात्रे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. लोकसभा निवडणुक तोंडावर असताना या प्रभागात झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत म्हात्रे यांचा अवघ्या ५२ मतांनी पराभव झाला.
सचिन यांचे या भागातील तबेला मालकाशी आधीपासून राजकीय वैमनस्य होते. या वैमनस्याचा फटका म्हात्रे याला निवडणुकीत बसला होता. दरम्यान, कळवा पोलीसांनी सचिन म्हात्रेसह सात जणांनविरोधात जीवघेणा हल्ला करणे, मारहाण, दमदाटी आणि शस्त्र परवाना कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.