आपल्या ४६ वर्षांंच्या राजकीय कारकिर्दीत लोकसभा, विधानसभा, विधान परिषद असा प्रवास करीत शरद पवार यांनी आता राज्यसभेवर जाऊन सारे वर्तुळ पूर्ण केले आहे. एकदा विधान परिषद आणि आता राज्यसभा असे दोनदा मागील दरवाज्याने सभागृहात प्रवेश केला आहे.
राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीकरिता राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि अ‍ॅड. माजिद मेमन यांनी निवडणूक अधिकारी अनंत कळसे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले. १९६७ पासून आतापर्यंत सातत्याने पवार निवडून आले आहेत. १९८४ मध्ये पवार पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. पण १९८५ मध्ये ते पुन्हा राज्याच्या राजकारणात परतले. १९९१ मध्ये नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्यावर लोकसभेवर ते पुन्हा निवडून आले. आतापर्यंत सात वेळा पवार लोकसभेवर निवडून आले आहेत. १९९३ मध्ये राज्याच्या मुख्यमंत्रीपद निवड झाल्यावर त्यांनी विधान परिषदेवर निवडून जाण्याचा पर्याय स्वीकारला. काँग्रेसची सत्ता गेल्यावर त्यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदही भूषविले.
लोकसभा, राज्यसभा (अधिकृत निवड अद्याप नाही), विधानसभा आणि विधान परिषद या संसद आणि विधिमंडळाच्या सर्व सभागृहांचे प्रतिनिधीत्व करण्याचा मान पवार यांना मिळाला़  संसदीय राजकारणापासून दूर राहण्याचा प्रयत्न होता, सहकार्याच्या आग्रहमुळे राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतल्याचे पवार यांनी सांगितले.

पाच वर्षांत मालमत्ता
चार पट वाढली!
२००९ च्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात अर्ज दाखल करताना पवार यांनी प्रतिज्ञापत्रात ८ कोटी ७० लाख रुपयांची मालमत्ता असल्याचे नमूद केले होते. राज्यसभेसाठी शुक्रवारी अर्ज सादर केला त्यात ३२ कोटींपेक्षा जास्त मालमत्ता दाखविली आहे. अर्थात त्यांची मालमत्ता चौपट झाली आह़े