अशी कोणतीही योजना नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका, असे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून जाहीर करावे लागले. परंतु भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी गरीबांच्या घरांसाठी केलेल्या एका अभिनव आंदोलनाचा मात्र फज्जा उडाला. निवडणुकीच्या तोंडावर आंबेडकरांना अडचणीत आणण्याची एका मोठय़ा पक्षाचीच ही खेळी असावी, अशी चर्चा आहे.
आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र लोकशाही आघाडीने मुंबईतील गरीब, श्रमिक व मध्यमवर्गीयांच्या घरांच्या प्रश्नांवर आंदोलनाची घोषणा केली होती. राज्य सरकारच्या वतीने १९८६ मध्ये कमकुवत घटकांसाठी स्वस्तात घरे उपलब्ध व्हावीत, म्हणून पवई एरिया डेव्हलपमेंट अशी योजना तयार करण्यात आली. त्या अंतर्गत पवई येथील २३० एकर जमीन ४० पैसे चौरस फूट दराने हिरानंदानी बिल्डरला देण्यात आली.
या योजनेत आर्थिकदृष्या दुर्बल घटकासाठी ४०० चौरस फुटांची व ५४ हजार रुपये किंमतीची ३००० घरे बांधावीत अशी अट घालण्यात आली होती. तसा राज्य शासन व हिरानंदानी बिल्डर यांच्यात करार झाला होता, असे आंबेडकर यांचे म्हणणे आहे. परंतु हिरानंदानी यांनी गर्भश्रीमंतांसाठी १२०० चौरस फुटांची घरे बांधून गरीबांची घरे हडप केली असा आरोप प्रकाश आंबेडकर, मिलिंद रानडे, विजय कुलकणी व कमलाकर सुभेदार या आघाडीच्या नेत्यांनी केला होता. या मुद्यावर २९ जानेवारीला प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कांजूर मार्ग रेल्वे स्थानक ते पवई असा सुमारे दहा हजार नागरिकांचा मोर्चा काढण्यात आला होता.
हिरानंदानी यांनी शासनाला फसवून गरिबांची हडप केलेली घरे पुन्हा मिळावीत यासाठी ५ फेब्रुवारीला हजारोंच्या संख्येने मुख्यमंत्र्यांना निवेदने देऊन अभिनव आंदोलन करण्याचा निर्णयही या आघाडीने घेतला होता.
मात्र, त्याच्या एक दिवस आधीच, मंगळवारी अचानकपणे हजारो नागरीक मंत्रालयात दाखल झाले व त्यांनी स्वस्तात घरे मिळण्यासाठी मुख्यमंत्रयांच्या नावाने अर्ज दाखल केले.
दुसऱ्या दिवशीही मंत्रालयाबाहेर हजारोंच्या रांगा लागल्या. ही अफवा असल्याचे नंतर स्पष्ट झाले. मात्र, या सगळय़ा धांदलीत आंबेडकर यांच्या एका अभिनव आंदोलनाचा मात्र फज्जा उडाला. आता, हे आंदोलन अपयशी ठरावे, यासाठीच एका बडय़ा राजकीय पक्षाने हे अर्ज वाटून लोकांची दिशाभूल केल्याची चर्चा होत आहे.