मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोटानंतरच ‘भगवा दहशतवाद’चा उल्लेख शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे या दोन तत्कालीन केंद्रीय मंत्र्यांनी केला होता आणि त्यावरून वाद निर्माण झाला होता. स्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यावर भगव्या दहशतवादावरून आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

मालेगाव स्फोटातील आरोपींना दहशतवादविरोधी पथकाचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांच्या पथकाने कसून तपास करीत अटक केली होती. यानंतर अलिबागमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या विभागीय अधिवेशनात तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी भगवा दहशवादाचा उल्लेख केला होता. राज्यात भगवा दहशतवाद वाढल्याबद्दल पवारांनी तेव्हा चिंता व्यक्त केली होती. तेव्हापासून ‘भगवा दहशतवाद’ हा शब्दप्रयोग रूढ झाला.

भाजप आणि संघ परिवाराला तेव्हा भगव्या दहशतवादावरून डिवचण्यात आले होते. भगवा दहशतवाद कधीच नव्हता, आताही नाही आणि भविष्यातही असणार नाही. ‘भगवा दहशतवाद’ असा शब्द तयार करून हिंदू दहशतवादाचा अपप्रचार करण्याचा प्रयत्न तत्कालीन यूपीए सरकारने केला होता, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलिल यांनी बॉम्बस्फोट घडविले कोणी, असा सवाल केला. केवळ अल्पसंख्याक समाजातील दहशतवादी हे चित्र रंगविण्यात आले होते हे चुकीचे होते, असेही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.