मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून सुरू झालेले राजकारण आता वैयक्तिक पातळीवर पोहोचले आहे. या विषयावरून शिवसेनेच्या दोन गटांतील महिला लोकप्रतिनिधींमध्ये समाज माध्यमांवर शाब्दिक युद्ध रंगले आहे. शिवसेनेच्या (ठाकरे) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांना मराठी भाषा येत नसल्यामुळे शिवसेनेच्या (शिंदे) महिला आघाडीने इयत्ता पहिलीचे मराठी बालभारती पाठ्यपुस्तक त्यांना भेट म्हणून पाठवले. त्यावरून चतुर्वेदी आणि शिवसेनेच्या (शिंदे) प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्यात वाद रंगला आहे. ‘मी अमराठी आहे…गद्दार नाही’, असा टोला चतुर्वेदी यांनी लगावला आहे. तर म्हात्रे यांनीही चतुर्वेदी दुसऱ्या पक्षातून आल्या असल्याची आठवण करून दिली.

हिंदी सक्तीच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आल्यामुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेच्या (ठाकरे) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांना शिवसेनेच्या (शिंदे) महिला आघाडीने इयत्ता पहिलीचे मराठी बालभारती पाठ्यपुस्तक भेट म्हणून पाठवले. चतुर्वेदी या मुंबईत शिकलेल्या असल्या तरी त्यांना मराठीचा ‘म’देखील येत नाही. त्यामुळे यांनी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातून मराठीचे धडे गिरवावेत आणि मराठी बोलायला शिकावे, अशी टीका शीतल म्हात्रे यांनी केली होती. त्यावरून चतुर्वेदी यांना दिवसभर समाजमाध्यमांवरून खूप ट्रोल केले.

माझे मराठी कमजोर असले, तरी इमान कमजोर नाही…

मराठी येत नसल्याच्या मुद्द्यावरून खूप टीका झाल्यानंतर चतुर्वेदी यांनी शुक्रवारी समाजमाध्यमांवरूनच मराठी भाषेतून आपली भूमिका मांडली आहे. आपल्याला मराठी येते, पण अस्खलित मराठी बोलता येत नाही. त्यावरून शाह सेनेने आणि त्यांच्या अनुयायांनी (फेलो पेड ट्रोल्स) आपल्यावर टीका केली. आपण ट्रोलर्सना कधीही उत्तर देत नाही. पण ट्रोलरनी आपला घरचा पत्ताच जाहीर केला आहे. त्यामुळे मला व माझ्या कुटुंबाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे उद्या काही झाले तरी त्याची जबाबदारी शिवसेनेच्या (शिंदे) प्रवक्त्यांची असेल, असा इशारा चतुर्वेदी यांनी दिला आहे. तसेच ‘माझे मराठी कमजोर आहे, पण माझे इमान कमजोर नाही’, असाही टोला चतुर्वेदी यांनी लगावला आहे.

खासदारकी वाचवण्यासाठी ….

चतुर्वेदी यांच्या या प्रत्युत्तराला पुन्हा शीतल म्हात्रे यांनीही उत्तर दिले. चतुरताई असा उल्लेख करीत म्हात्रे यांनी चतुर्वेदींना सांगितले आहे की, खासदारांचा पत्ता हा आधीच जगजाहीर असतो. त्यामुळे त्यात काही लपून राहत नाही. दुसऱ्या पक्षातून आलेल्या चतुरताई इमानावर बोलत आहेत, असे म्हणत म्हात्रे यांनी चतुर्वेदी यांना आठवण करून दिली. आपली खासदारकी वाचली पाहिजे म्हणून तुम्ही कोणाकोणाच्या गाठीभेटी घेत फिरलात त्याची यादी आमच्याकडे आहे, असाही दावा म्हात्रे यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठी कच्चे आहे, बोलता येत नाही…

आपले मराठी कच्चे आहे, बोलता येत नाही, असे प्रियंका चतुर्वेदी यांनी एका मुलाखतीत म्हटले होते. त्यावरून म्हात्रे म्हणाल्या की, चतुर्वेदी यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झाले. ३० ते ३५ वर्ष मुंबईत राहूनही त्यांना मराठी बोलता येत नाही का ? पाच वर्षांपासून खासदार असलेल्या चतुर्वेदींना मराठी शिकायला वेळ मिळाला नाही का? असा सवाल शीतल म्हात्रे यांनी उपस्थित केला होता. ‘म’ मराठीचा म्हणून मोर्चा काढणारे, ‘म’ महाराष्ट्राचा म्हणून बोलणारे उबाठाचे नेते चतुर्वेदी यांच्या कमकुवत मराठीवर कारवाई करण्याची धमक दाखवतील का, असा सवालही म्हात्रे यांनी केला होता. त्यानंतर या दोघींमध्ये वाद सुरू झाला आहे.