मुंबईकरांना वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा शक्य
मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या सातही तलाव क्षेत्रांमध्ये दमदार पाऊस झाला असून तलावांमध्ये तब्बल १४ लाख १६ हजार २१७ दशलक्ष म्हणजेच ९७.८५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तर अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा आणि भातसा कोणत्याही क्षणी ओसंडून वाहण्याच्या बेतात आहेत. परिणामी, पुढील वर्षभर मुंबईकरांना सुरळीत आणि मुबलक पाणीपुरवठा होऊ शकेल, असा विश्वास जल विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
मुंबईकरांना अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी तलावांमधून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मे महिन्यामध्ये या तलावांनी तळ गाठला होता. त्यामुळे जल विभागातील अधिकारी चिंतित झाले होते.गेले दोन-तीन दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सातही तलावांमध्ये तब्बल १४ लाख १६ हजार २१७ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. सातपैकी मोडक सागर, तानसा, विहार आणि तुळशी तलाव यापूर्वीच ओसंडून वाहू लागले आहेत. तर अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा आणि भातसा कोणत्याही क्षणी ओसंडून वाहण्याच्या बेतात आहेत. अप्पर वैतरणाची कमाल पाणी साठय़ाची क्षमता ६०३.५१ मीटर इतकी असून आजघडीला या तलावामध्ये ६०३.३० मीटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. मध्य वैतरणा धरणाची पाणी साठय़ाची कमाल पातळी २८५ मीटर असून हा तलाव भरून वाहण्यासाठी केवळ ०.५० मीटर पाण्याची आवश्यकता आहे. भातसा धरणाची कमाल पाणीसाठा क्षमता १४२.०७ मीटर असून या धरणामध्ये आजघडीला १४१.२७ मीटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. हे तिन्ही तलाव लवकरच ओसंडून वाहू लागतील, असा विश्वास जल विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
आजघडीला तलावांमध्ये ९७.८५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र १ ऑक्टोबर रोजी तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यामुळे पुढील वर्षभर मुंबईकरांना सुरळीत आणि मुबलक पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. सप्टेंबर महिना आताच सुरू झाला आहे. उर्वरित काळात पावसाने दडी मारल्यास त्याचा परिणाम तलावांमधील साठय़ावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.