पर्यावरणाच्या मुद्दय़ावर ओडिसा आणि कर्नाटकमध्ये स्थानिकांच्या विरोधामुळे माघार घ्यावी लागलेल्या कोरियातील ‘पॉस्को’ कंपनीचा पोलाद प्रकल्प आता भागीदारीत कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे. प्रस्तावित जैतापूर प्रकल्पानंतर कोकणात उभा राहणारा हा मोठा प्रकल्प आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातीस सातार्डा येथे ‘उत्तम गालव्हा’ कंपनीबरोबर भागीदारीत कोरियातील पॉस्को कंपनी हा प्रकल्प उभारणार आहे. सुमारे २० हजार कोटींचा हा प्रकल्प दोन हजार एकर जागेत उभा राहणार आहे. प्रकल्पाकरिता पर्यावरणविषयक सर्व परवानग्या असल्याचा दावा उत्तम कंपनीने केला आहे. मात्र ओडिसात सुमारे ७० हजार कोटी गुंतवणुकीचा महाकाय प्रकल्प उभारणे पॉस्को कंपनीला अजून यश आलेले नाही. स्थानिकांच्या विरोधाने अद्यापही पर्यावरणविषयक परवानगी मिळालेली नाही. कर्नाटकातही विरोध झाल्याने या कंपनीने माघार घेतली. नियोजित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला पर्यावरणाच्या मुद्दयावरच शिवसेनेने तीव्र विरोध दर्शविला आहे. कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठा प्रकल्प उभा राहात असल्याने शिवसेनेची भूमिका महत्त्वाची आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील म्हणून जाहीर झाला आहे. अशा वेळी पॉस्को प्रकल्पामुळे पर्यावरणाची किती हानी याचा विचार करावा लागेल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे स्थानिक खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली. उत्तम कंपनीबरोबर भागीदारीत उभा राहणाऱ्या या प्रकल्पाला यापूर्वीच्या सरकारने पर्यावरण विषयक परवानगी दिल्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सांगितले. गेल्याच आठवडय़ात ‘फॉक्सकॉन’ कंपनीने राज्यात ३५ हजार कोटी गुंतवणुकीचा प्रकल्प उभारण्याकरिता राज्य शासनाबरोबर सामंजस्य करार केला.
यापाठोपाठ पॉस्को आणि उत्तम यांच्या संयुक्त भागीदारीतून सुमारे २० हजार कोटीच्या गुंतवणुकीचा प्रकल्प उभा राहात आहे. यावरून देशात गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रालाच पसंती असल्याचे सिद्ध होते, असे महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 13th Aug 2015 रोजी प्रकाशित
पॉस्कोचा प्रकल्प आता कोकणात
पर्यावरणाच्या मुद्दय़ावर ओडिसा आणि कर्नाटकमध्ये स्थानिकांच्या विरोधामुळे माघार घ्यावी लागलेल्या कोरियातील ‘पॉस्को’ कंपनीचा पोलाद प्रकल्प आता भागीदारीत कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे.

First published on: 13-08-2015 at 05:30 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Posco steel project now in konkan