गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पाऊस पडत असून रविवारी सायंकाळीही विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दिवसभर हवामान ढगाळ राहणार आहे. गणेशोत्सवादरम्यान मुंबईत पुन्हा एकदा पाऊस कोसळायला सुरुवात झाली. त्यानंतर पाच सहा दिवस सलग सायंकाळी पाऊस पडतो आहे. मुंबईत शनिवारी मुसळधार पाऊस पडला नसला तरी सायंकाळी हलक्या सरींनी हजेरी लावली. शहर भागात ५.२६ मिमी, पूर्व उपनगरात १०.१८मिमी तर पश्चिम उपनगरात १०.८१ मिमी पाऊस झाला.

हेही वाचा : GST Invoice Racket : भिवंडीत १३२ कोटींच्या बनावट इनव्हॉइस रॅकेटचा पर्दाफाश; मुख्य सूत्रधारास अटक

रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः सायंकाळी आणि रात्री विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट होऊन पाऊस कोसळेल अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुपारी साडे बारा वाजता समुद्राला मोठी भरती येणार असून यावेळी समुद्रात ४.७१ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. तर दुसरी भरती ही मध्यरात्री एक वाजता असेल यावेळी साडे चार मीटर उंचीच्या लाटा उसळतील