काही दिवसांपूर्वी नोटाबंदीच्या मुद्द्यावरून भेटायला आलेल्या शिवसेना खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करत चांगलेच पेचात पकडले होते. त्यानंतर आता भाजपने मुंबईतदेखील याच मुद्द्यावरून शिवसेनेची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपकडून शनिवारी शिवसेना भवनसमोरील परिसरात पोस्टर लावण्यात आले. त्यानंतर शिवसेनेकडूनही याच पोस्टरच्या बाजूला दुसरे पोस्टर लावून भाजपला आक्रमकपणे उत्तर देण्यात आले. भाजपच्या पोस्टरवर नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असून यामध्ये बाळासाहेब मोदींना आशिर्वाद देत आहेत, असे दाखविण्यात आले आहे. पोस्टरवर हातामध्ये रुद्राक्षाची माळ असलेला बाळासाहेबांचा हात आशिर्वादासाठी उंचावलेला दिसत आहे. ‘काळ्या पैशाचा खात्मा हेच अच्छे दिन’, असा संदेशही पोस्टरवर लिहला आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांच्या कार्यकर्त्यांनी हे पोस्टर्स लावले आहेत. अशाप्रकारे पोस्टर्स लावून भाजपने सेनेला डिवचल्यामुळे आता दोन्ही पक्षांतील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. या पोस्टर्समुळे आता शिवसेनेत प्रतिक्रिया उमटण्यास सुरूवात झाली आहे. शिवसेनेने भाजपच्या या खोचक टीकेला पोस्टर लावूनच उत्तर दिले. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींचा केविलवाणा आक्रोश… शेवटी भाजपला शिवसेनाप्रमुखांची आठवण झालीच’, असा मजकूर सेनेच्या पोस्टरवर छापण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नोटाबंदीच्या निर्णयाने त्रस्त झालेले सर्वसामान्य आणि शेतकरी वर्ग, जिल्हा सहकारी बँकांमध्ये नोटा बदलण्यासाठी घातलेली बंदी अशा विविध मुद्यांसंदर्भात शिवसेना खासदारांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीचा अधिकृत तपशील उपलब्ध झाला नसला तरी यावेळी मोदींनी शिवसेना खासदारांना शाब्दिक चिमटे काढल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. तुमचा विरोध असला तरी तुम्हाला आमच्यासोबतच राहायचे आहे असेही त्यांनी शिवसेनेच्या खासदारांना सांगितले. नोटाबंदीवरुन शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असून यावरुन शिवसेनेने नोटाबंदीवरुन भाजपवर टीका केली आहे. नोटाबंदीविरोधात ममता बॅनर्जी यांनी काढलेल्या मोर्चात शिवसेना नेत्यांनी सहभाग घेत केंद्र सरकारला घरचा आहेर दिला होता. दरम्यान, या बैठकीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील सावध प्रतिक्रिया दिली होती. नरेंद्र मोदींच्या मनात बाळासाहेबांविषयी असलेल्या आदराबद्दल मी त्यांचा आभारी आहे असे ते म्हणालेत. पण नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असून त्यांनी जनतेला भेडसावणा-या प्रश्नांचे त्यांनी उत्तर देणे अपेक्षित आहे. उत्तर मिळाल्यावर सर्वसामान्यांचे जीवन सुरळीत झाल्यास बाळासाहेबांना आनंद होईल, असे उद्धव यांनी म्हटले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poster war between shiv sena and bjp over balasaheb thackeray blessing
First published on: 26-11-2016 at 16:30 IST