देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बत्ती गुल झाली. मुंबईबरोबरच ठाणे, नवी मुंबईतील अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे. सोमवारी सकाळी सव्वा दहा वाजताच्या सुमारास अचानक वीज पुरवठा खंडित झाला. पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाच वेळी मुंबईतील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याचे वृत्त आहे.  मात्र आता यावरुन अभिनेत्री कंगना राणौतपासून ते चित्रपट दिग्दर्शक अशोक पंडित यांच्यापर्यंत अनेकांनी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. सत्तेत असणाऱ्या म्हणजेच पॉवरमध्ये असणाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे पॉवर कटची समस्या निर्माण झाल्याचा सूर अनेकांनी लगावला आहे.

नक्की वाचा >> समजून घ्या : तुमच्या घरी वीज कशी येते? ग्रीड फेल्युअर म्हणजे काय?

मागील काही काळापासून महाराष्ट्र सरकारविरोधात भूमिका घेणारी अभिनेत्री कंगनाने ट्विटरवरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि स्टॅण्डअप कॉमेडियन कुणार कामराचा फोटो शेअर करत महाराष्ट्र सरकारला टोला लगावला आहे. राऊत यांनी कुणालच्या पॉडकास्टला काल हजेरी लावली त्याचा फोटो कुणालने शेअर केला होता. हाच फोटो ट्विट करत कंगनाने, “मुंबईत वीजपुरवठा खंडित झाला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकार क-क-क…….कंगना करण्यात व्यस्त आहे,” असं ट्विट केलं आहे.

दिग्दर्शक अशोक पंडित यांनाही महाविकास आघाडीवर टीका केली आहे. “महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पॉवरलेस झाली आहे. यासाठी ते आता रिपब्लिक आणि अर्नब गोस्वामीला दोष देणार नाही अशी अपेक्षा आहे. मुंबईच्या इतिहासामध्ये अशाप्रकारे कधीच वीजपुरवठा खंडित झाला नव्हता. हे ग्रीड फेल्युअर म्हणजे सरकार प्रशासनामध्ये अपयशी ठरत असल्याचे हे उदाहरण आहे,” असं अशोक पंडित यांनी म्हटलं आहे.

भाजपाच्या आयटी सेलच्या प्रमुख आणि भाजपा महिला मोर्चाच्या नेत्या असणाऱ्या प्रीती गांधी यांनी ट्विटवरवरुन महाराष्ट्रातील पॉवर फेल्युअर हे महाराष्ट्रात पॉवरमध्ये असणाऱ्यांचे फेल्युअर दाखवते असं टोला लगावला आहे.

मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या कळवा-पडघा आणि खारघर उपकेंद्रांमधील वीज वाहिन्यांमध्ये आणि ट्रान्फॉरमर्समध्ये अनेक ठिकाणी ट्रीपिंग झाल्याचे वृत्त आहे. मुंबई आणि उपनगरांना होणाऱ्या वीजपुरवठ्यापैकी ३६० मेगावॅट पुरवठ्याला याचा फटका बसला आहे. हा तांत्रिक बिघाड दूर करुन वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सध्या सुरु आहे. मात्र यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. रायगड जिल्ह्यालाही या तांत्रिक बिघाडाचा फटका बसला असून तिथेही अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. अदानी समुहानेही ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. ३८५ मेगा व्हॅट वीजपुरवठा खंडित झाला असल्याचे अदानी समुहाने ट्विटरवरुन म्हटलं आहे. मुंबईतील उपनगरीय वाहतूक सेवेलाही या ग्रीड फेल्युअरचा फटका बसला आहे. मध्य रेल्वेचे प्रमुख प्रवक्त्यांनी यासंदर्भातील माहिती दिल्याचे वृत्त एएनआयने दिलं आहे. मुंबईतील जुहू, अंधेरी, मिरारोड, नवी मुंबई, ठाणे आणि पनवेलमधील अनेक टिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याचे वृत्त आहे. ट्विटरवरही अनेकांनी आपल्या परिसरातील वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती दिली आहे.