सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेला दिलासा आणि आता बेस्ट समितीने घेतलेला पुढाकार यामुळे वरळीमधील कॅम्पाकोलातील ‘त्या’ सर्व सदनिका गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर उजळून निघणार आहेत. गुढीपाडव्यानिमित्त बेस्ट उपक्रमाने कॅम्पाकोलावासीयांना गोड भेट दिली आहे. बेस्ट उपक्रमाने कॅम्पाकोलामधील विद्युतपुरवठा पूर्ववत करण्याची कारवाई गुरुवारपासून सुरू केली असून काही सदनिका दिव्याच्या प्रकाशात उजळून निघाल्या आहेत.
पाणीपुरवठय़ाच्या मागणीवरून कॅम्पाकोला आणि पालिकेतील वाद चिघळला आणि तो सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. कॅम्पाकोलामधील ३५ मजले अनधिकृत असल्याने त्याविरुद्ध कारवाईचे आदेश न्यायालयाने दिले होते. पालिकेने या अनधिकृत मजल्यांविरुद्ध कारवाईला सुरुवातही केली होती. अनधिकृत सदनिकांचा वीजपुरवठा बेस्टने, तर गॅसपुरवठा महानगर गॅसने खंडित केला होता. तसेच अनधिकृतपणे केलेल्या पाण्याच्या जोडण्या पालिकेने तोडून टाकल्या होत्या.
दरम्यानच्या काळात राजकीय पक्ष कॅम्पाकोलावासीयांच्या पाठीशी उभे राहिले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही अनधिकृत सदनिकांमधील रहिवाशांना ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश देत दिलासा दिला. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यामुळे कॅम्पाकोलामधील खंडित केलेला वीजपुरवठा पूर्ववत करावा आणि न्यायालयाचा निकाल लागल्यावर योग्य तो निर्णय घ्यावा, असा मुद्दा मनसेचे नगरसेवक केदार हुंबाळकर यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत उपस्थित केला होता. सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी त्यास पाठिंबा दिला होता.बेस्ट समितीची सूचना लक्षात घेऊन बेस्ट प्रशासनाने गुरुवारपासून कॅम्पाकोलामधील विद्युतपुरवठा पूर्ववत करण्याची कारवाई सुरू केली. कॅम्पाकोलामधील एकूण ९१ अनधिकृत सदनिकांचा विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र न्यायालयाकडून दिलासा मिळताच ९१ की ४४ रहिवाशांनी आवश्यक कागदपत्रांसह वीज मीटरसाठी बेस्ट उपक्रमाकडे अर्ज केले होते. बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी जोडणीचे काम हाती घेतले असून गुरुवारी पाच सदनिकांमधील विद्युतपुरवठा सुरू करण्यात आला होता. गुढीपाडव्यापर्यंत ४४ सदनिका दिव्याच्या उजेडात उजळून निघतील, अशी अपेक्षा आहे.

‘ पाणी, गॅसपुरवठाही पूर्ववत करावा’
 सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेला दिलासा, मुख्यमंत्री, पालिका आयुक्त आणि राजकीय पक्षांकडून मिळालेले पाठबळ यामुळे कॅम्पाकोलामधील रहिवाशांच्या डोक्यावरची टांगती तलवार दूर झाली आहे. बेस्ट उपक्रमाने विद्युतपुरवठा पूर्ववत करण्याची कारवाई सुरू केली आहे. आता पालिकेने पाणी आणि महानगर गॅस कंपनीकडून गॅसचा पुरवठा पूर्ववत झाल्यास रहिवाशांना अधिक दिलासा मिळेल, अशी मागणी कॅम्पाकोलामधील रहिवाशी आणि कॅम्पाकोला बचाव कृती समितीच्या नंदिनी दास यांनी केली आहे.